पझेसिव्हनेस 22 - नोकरीचे ठिकाण/ऑफिस/संस्था/संघटना

'नोकरी लागल्यावर बदलले', 'आता पैसेवाले झाले म्हणून आम्हाला विसरले' असे डायलॉग सुद्धा अनेकदा आपण ऐकलेले किंवा बोललेलो असतो. आपल्या मित्र-मैत्रिणींना नोकरी लागल्यानंतर त्यांचा आपल्यासोबतचा वेळ कमी होतो, कॉल/मेसेज करणे कमी होते हा अनुभव अनेकांचा असेल. त्यात जर नोकरीसाठी इतर कुठे दूरच्या ठिकाणी शिफ्ट व्हावे लागले असेल, मग तर हा संपर्क खूपच कमी होतो आणि मग मित्र-मैत्रिणींच्या तक्रारी सुरू होतात. यात पुन्हा स्वभावाचा भाग येतो. काहीजणांचा स्वभाव मागच्या आठवणींमध्ये जास्त न अडकता नवीन ठिकाणी लगेच रमण्याचा असतो तर काहीजणांना मात्र नवीन ठिकाणी रमायला खूप वेळ लागतो व ते मागच्याच आठवणींतून लवकर बाहेर निघू शकत नाहीत. अशा वेळी मग त्यांच्या मनात अगदी जवळ असणाऱ्या मित्र-मैत्रिणींबद्दल ते पझेसिव्ह होतात.

पुढे नोकरीच्या ठिकाणी सुद्धा अशा गोष्टी घडतात. काही वाचकांनी स्वतःहून असे काही अनुभव सांगितले कि ज्यात ऑफिस मधल्या सहकाऱ्यांबद्दल सुद्धा पझेसिव्ह असणारी माणसं त्यांनी पाहिली आहेत. यात सगळ्याच क्षेत्रातील उदाहरणं सापडतील. अगदी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपासून तर खाजगी किंवा कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांपर्यंत सगळीकडे अशी पझेसिव्हनेसची उदाहरणे दिसून येतात. आपल्या शाळेतील शिक्षकांबाबत पझेसिव्ह असणारे विद्यार्थी व एखाद्या विद्यार्थ्याबाबत पझेसिव्ह असणारे शिक्षक अशी उदाहरणे सुद्धा आपल्याला दिसतात आणि त्याचवेळी शिक्षकांमध्ये सुद्धा आपापसात पझेसिव्ह असणारे शिक्षक सुद्धा दिसतात. तसेच एखाद्या कंपनीत, बँकेत किंवा ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या अधिकाऱ्यांबाबत वाटणारे प्रेम सुद्धा अनेकदा पझेसिव्हनेस मध्ये बदलून त्यातून अनेकदा अडचणी होताना दिसतात. 'आम्हाला हेच अधिकारी कायम हवेत' असा आग्रह आणि त्यात त्यांची अचानक बदली झाली तर एखाद्याला होणारा मानसिक त्रास आणि त्यातून मग नोकरीत मनच न लागणे, नोकरी सोडावी वाटणे, आपण पण तिथेच बदली करून घ्यावी असे वाटत राहणे असे अनेक प्रकार घडतात. हेच अनेकदा उलट सुद्धा असते. म्हणजे अनेक अधिकारी हे त्यांच्या स्टाफ मधील एखाद्याबद्दल किंवा काहीजणांबद्दल असेच पझेसिव्ह असतात आणि ते कायम आपल्या सोबतच असावेत असा त्यांचा आग्रह असतो. त्यातून पण अनेक अडचणी उभ्या राहत असतात. सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एखाद्या संस्थेबद्दल/संघटनेबद्दल आणि तिथल्या स्टाफ बद्दल/कार्यकर्त्यांबद्दल असा पझेसिव्हनेस तयार झालेला असतो. त्यातून ही संस्था/संघटना व इथला स्टाफ/कार्यकर्ते हे माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहेत व यांच्याशिवाय मी जगूच शकत नाही अशी त्यांची भावना झालेली असते. त्यातून काही कारणांनी ती संस्था सोडावी लागली तर दुसरीकडे कितीही चांगल्या संस्थेत काम मिळालं तरी त्यांचं मन लागत नाही व किंवा दुसरी कितीही चांगली संधी मिळत असली तरी ते ही संस्था सोडायला तयार होत नाहीत आणि इथल्या स्टाफने पण इथंच नेहमी आपल्या सोबतच राहावं असंच त्यांना वाटत असतं.
असंच एखाद्या संघटनेत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना संघटना ही आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग वाटत असते आणि त्यामुळे संघटनेत झालेल्या कोणत्याही बऱ्या वाईट गोष्टींचा परिणाम त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर व कुटुंबावर होत असतो. असंच आपल्या सोबत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांबद्दल सुद्धा अनेकदा होतं. त्यांच्याबद्दल मनात तयार झालेल्या जवळकीच्या नात्यामुळे आता ते नेहमीच सोबत असायलाच हवेत अशी नकळत मनात तीव्र इच्छा तयार होते आणि ते आपल्यापासून किंवा या संघटनेपासून दूर जातील किंवा काम करणं कमी करतील किंवा थांबवतील ही कल्पना सुद्धा आपल्याला सहन होत नाही. याचे कारण म्हणजे आपल्या नकळतच आपल्या मनात या संघटना व इथल्या काही साथीदारांबाबत पझेशनची भावना तयार झालेली असते. त्यातून आपण त्यांना गृहीत धरून आपली मते व इच्छा त्यांच्यावर लादत असतो. अनेकदा अनेकजण आपल्या संस्थे/ संघटनेपासून दूर जायला लागलेले असताना अशा साथीदारांच्या पझेसिव्हनेस मुळेच थांबतात व पुढे अगदी छान काम सुद्धा करतात. तर अनेकदा यामुळे काहींचा कोंडमारा सुद्धा होतो.
पझेसिव्हनेसमुळे कधी काहीजणांना काही प्रमाणात फायदा सुद्धा होत असतो तर कधी ते नुकसानकारक सुद्धा ठरत असते. याविषयी पुढच्या लेखात बोलूच.
- सचिन (8424041159)
(तुमचेही याविषयीचे काही अनुभव, मतं, प्रतिक्रिया असतील तर नक्की शेअर करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध