पझेसिव्हनेस 21 - लग्नानंतर मित्र-मैत्रिणी
'लग्न झाल्यापासून पूर्ण बदलला आहेस', 'लग्न झाल्यापासून आम्हाला विसरूनच गेली', 'आधी किती सारखं फोन करायचे, सगळं माझ्याशी शेअर करायचे, किती किती प्लॅन करायचो, गप्पा मारायचो आम्ही आणि आता मात्र आमची आठवण सुद्धा काढत नाही'. 'माणसं लग्नानंतर बदलतात हे ऐकलं होतं, पण इतकी बदलत असतील असं नव्हतं वाटलं कधी'.
ही वाक्य आपल्यातील अनेकांनी ऐकलेली किंवा बोललेली असतील.
आपल्या ग्रुपमधील कुणा मित्र मैत्रिणीचे लग्न झाले कि ते हमखास सर्व मित्र मैत्रिणींपासून दूर जातातच, हा एव्हाना एक सार्वत्रिक अनुभव झाला आहे. त्याची कारणे वेगवेगळी असू शकतात. कधी जोडीदाराला चालत नाही म्हणून मित्र-मैत्रिणी कमी करावे लागतात किंवा अंतर ठेवावे लागते. याविषयी आपण मागे एका लेखात बोललो आहोतच. पण कधी कधी अनेकजण असे कुणाचे बंधन नसतानाही स्वतःहूनच मित्र मैत्रिणींपासून दूर होतात. याचे कारण अनेकदा नवीन नातं, त्यातील नवीन गोष्टी, नवीन जबाबदाऱ्या व एकमेकांना द्यायचा वेळ आणि बऱ्याचदा लग्न हे आपले आयुष्यच पूर्णपणे बदलवून टाकणारी घटना असते. आधी आपण घरात इतर सदस्य असूनही आपल्या जगात एकटेच असणारे असतो. त्यावेळी आपले मित्र मैत्रिणी आपल्याला जास्त जवळ असतात आणि सारखं त्यांच्याशी बोलावं, सगळं शेअर करावं, त्यांना भेटावं, त्यांच्याबरोबर मस्ती, धम्माल करावी, पार्ट्या कराव्या, पिकनिक/ट्रेक करावेत असं वाटत असतं. पण लग्नानंतर जेव्हा आपल्या खूप जवळ असणारी एक व्यक्ती आपल्या आयुष्यात येते तेव्हा आपले सगळे प्राधान्यक्रम आपसूकच बदलत जातात. आत्तापर्यंत मैत्रीसाठी जे जे करायची तयारी होती, ते ते सगळं एकवटून जोडीदारावर प्रेम करावंसं वाटत असतं. आपला जास्तीतजास्त वेळ जोडीदाराबरोबर कसा घालवता येईल असं वाटत असतं. शिवाय घरात सुद्धा वातावरण खूप बदलून गेलेलं असतं. घरातील सर्वच नात्यांचे रोल आता बदललेले असतात. आई आता सासू झालेली असते, वडील सासरे, भाऊ दीर तर बहीण नणंद झालेली असते आणि या सगळ्या बदललेल्या रोल नुसार या आपल्याच घरातील माणसांचे नवनवे रूप पण आपल्या समोर येत असते. मुलींचं तर लग्नानंतर घर, नाव, गाव व बऱ्याच गोष्टी बदलून गेलेल्या असतात. एक नवीच ओळख व नवेच जग तिला मिळालेले असते. या नवीन जगात स्वतःला सावरत असतानाच इतर सर्वांसोबत जुळवून घेण्याचे सुद्धा दडपण तिच्यावर असते. त्याचवेळी मुलावर आपल्या नवीन जोडीदाराला विश्वासात घेण्याचे आणि त्याचवेळी घरातील बदललेल्या नात्यांना तोंड देण्याचेही मोठे दडपण असते.
या सगळ्यांना तोंड देत देत हे दोघे एकमेकांना अधिक वेळ देण्याचा व एकमेकांचा विश्वास मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. या सगळ्यात साहजिकच मित्र-मैत्रिणी यांचा विचार व यांचा वेळ कमी होणे साहजिक असते. बरेच प्राधान्यक्रम बदललेले असतात. आता एकमेकांसोबत व घरात जास्त वेळ देणे गरजेचे झालेले असते आणि त्यामुळे बाहेरचा वेळ आपसूक कमी झालेला असतो.
अशा परिस्थितीत मित्र-मैत्रिणींनी सुद्धा तक्रारी न करता स्वतः कॉल किंवा मेसेज करून संपर्क कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्यापेक्षा साहजिकच आता आपल्यासोबत बोलणं कमी होईल, प्रत्यक्ष भेटीगाठी व प्लॅन्स सुद्धा कमी होतील हे मान्य केले तर फार तक्रारींना जागा राहात नाही. उलट लग्न झालेल्या मित्र-मैत्रिणींना वेळ नसेल तर आपण स्वतःहून आठवण येईल तेव्हा फोन करून त्यांची चौकशी करणे गरजेचे आहे. अर्थात त्यांना ते चालणार आहे ना याचा अंदाज घेऊनच. कारण आजूबाजूचे वातावरण व परिस्थिती जशी बदलते तसे प्रत्येकाचे प्राधान्यक्रम सुद्धा बदलतात हे लक्षात घेणे गरजेचे आहे.
- सचिन (8424041159)
(तुमचेही काही अनुभव, मतं, प्रतिक्रिया असतील तर नक्की शेअर करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा