पझेसिव्हनेस 20 - लग्नानंतर कुटुंबीय

लग्नानंतर जोडीदारांमध्ये तर पझेसिव्हनेस येतोच पण त्याचबरोबर कुटुंबियांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात हा पझेसिव्हनेस येत असतो. आपल्या नजरेसमोर लहानाची मोठी झालेली आपली मुलगी आता आपल्याला सोडून जाणार या भीतीने कित्येक पालक पझेसिव्ह होतात. एक मैत्रीण सांगत होती कि तिच्या लग्नाआधी तिची आई कधीच तिची एवढी काळजी व चौकशी करत नव्हती, पण अचानक लग्नानंतर तिला माझी खूपच काळजी वाटायला लागली आणि त्यातून तिचे सारखेच फोन वाढायला लागले. मुलीचे आई-वडील, भाऊ-बहीण व कुटुंबीय यांना तिच्या अचानक जाण्याने घरात तयार झालेली पोकळी व तिची वाटणारी काळजी हे साहजिकच आहे. पण सतत काळजी करत राहणे, चौकशी करत राहणे व त्यांच्या घरातील बारीकसारीक गोष्टींमध्ये लक्ष घालणे हे पझेसिव्हनेसचे लक्षण आहे. त्याचा मुलीच्या वैवाहिक आयुष्यावर वाईट परिणाम पण होऊ शकतो. मुलीच्या कुटुंबियांपेक्षा जास्त प्रमाणात पझेसिव्हनेस हा मुलाकडच्या कुटुंबियांमध्ये दिसून येतो. लग्नाआधी वेगळा वागणारा मुलगा लग्नानंतर अचानक बदलला असं त्याच्या घरच्यांना वाटायला लागतं.

लग्नाआधी आमच्यासोबत खूप वेळ घालवायचा, रात्री उशिरापर्यंत गप्पा मारायचा आणि आता बायको आल्यापासून सारखा तिच्या कुशीत असतो, आम्हाला वेळच देत नाही अशी मुलाच्या आईवडिलांची तक्रार असते. मुलाची बहिण, भाऊ यांनाही असंच वाटत असतं कि आधी आपल्याबरोबर एवढं खेळणारा, वेळ घालवणारा, सगळं काही आपल्याशी शेअर करणारा भाऊ आता फक्त वहिनी आल्यामुळे आपल्यापासून दूर जातोय. या सगळ्याचा दोष घरात नव्याने आलेल्या त्या मुलीचाच आहे असं समजून मग हे सगळे कुटुंबीय सतत त्या नवीन मुलीला टोचून बोलणं, टोमणे देणं सुरू करतात. मुलाविषयी त्यांच्या मनात तक्रारी सुरू होतात. आधी आम्हाला बाहेर फिरायला घेऊन जाणारा मुलगा आता आम्हाला सोडून तिलाच एकटीला फिरायला नेतो, आधी मूवी पाहायला जाताना याला नेहमी आम्ही सोबत लागायचो आणि आता तर आम्हाला विचारत पण नाही, दोघेच जातात असं त्याच्या भावा-बहिणींना वाटत असतं. आधी एकेक रुपयांचा घरात हिशेब सांगणारा मुलगा आता आपल्याला पैशाचा हिशेब देत नाही, आधी आपल्याला विचारल्याशिवाय घरात कोणतीही वस्तू न आणणारा मुलगा आता बायकोच्या सांगण्यावरून नवनवीन वस्तू घरात आणतो असं आईवडिलांना वाटत असतं. तर दादाच्या बाईक वर नेहमी मीच बसायचे, पण आता माझी जागा गेली किंवा आधी प्रत्येक रक्षाबंधन ला दादा माझ्याकडे यायचा, पण आता तो त्याच्या बायकोसोबत सासरी जातो यामुळे बहिणीला वाईट वाटत असते. अशा बऱ्याच गोष्टी असतात कि ज्या मुलाच्या कुटुंबियांना त्या मुलाबाबत अधिक पझेसिव्ह करतात किंवा त्यांच्या मनातील पझेसिव्हनेस बाहेर काढतात. आपला मुलगा किंवा भाऊ जसा लग्नाआधी होता, तसाच लग्नानंतर पण राहावा असं वाटण्यातून हा पझेसिव्हनेस जास्त वाढतो व त्याचे खापर घरातील सुनेवर फोडलं जातं आणि त्यातून घरात धुसपूस व वादाला सुरुवात होते. लग्नानंतर एक स्पेशल व त्यांच्या सर्वांत जास्त जवळ असणारी व्यक्ती मुलांच्या आयुष्यात येतेय व त्यामुळे साहजिकच त्यांचे पुढचे आयुष्य तिच्याभोवती जास्त गुंफले जाणार ही नैसर्गिक भावनाच बऱ्याचदा कुटुंबियांना मान्य होत नाही आणि त्यातून मग त्यांची मानसिक अवस्था बदलत जाते. मग लग्नाआधीचे आपल्याशी वागणे आणि लग्नानंतरचे वागणे यात तुलना होऊ लागते आणि आपल्यापासून मुलाचं दूर जाणं पचवता न आल्याने त्याचा परिणाम स्वतःचे व कुटुंबाचे मानसिक स्वास्थ्य बिघडवण्यामध्ये होतो. त्यासाठी खरंतर मुलाचे लग्न करण्याआधीच मुलाच्या कुटुंबीयांनी ही मानसिक तयारी करून ठेवायला हवी आणि मगच मुलाचे लग्न करण्याचा विचार करायला हवा. आपला मुलगा ही आपली मालकी नसून ती एक स्वतंत्र व्यक्ती आहे व त्याच्या आयुष्यात आपल्यापेक्षा महत्वाची इतर कोणी व्यक्ती सुद्धा असू शकते हे मान्य करायला हवे. बहुतेकदा मुलांच्या आईमध्येच मुलांबद्दलचा हा पझेसिव्हनेस जास्त प्रमाणात असतो आणि मुलाच्या आयुष्यात येणारी नवीन मुलगी आपल्या मुलाच्या आयुष्यातलं आपलं स्थान कमी करील कि काय ही भिती सतत तिच्या मनात असते. लग्नानंतर सुद्धा मुलांनी आधीसारखंच ममाज बॉय बनून राहावं अशी नकळत अपेक्षा अनेक आईंची असते (अर्थात त्यांना स्वतःला मात्र प्रत्यक्ष उदाहरणातून दाखवून दिल्याशिवाय ते मान्य होत नसतं). यासाठी खरंतर मुलाच्या लग्नाच्या आधीच घरात काम सुरू व्हायला हवं. आधीपासूनच घरातल्यांची मुलाबद्दलची भावनिक गुंतवणूक व अपेक्षा कमी करून त्यात पुरेसं भावनिक, शारीरिक व आर्थिक अंतर मेंटेन करता आलं तर पुढे जाऊन घरात येणाऱ्या जोडीदाराला व घरातील सर्व नवीन नात्यांवर या गोष्टींचा वाईट परिणाम होणार नाही व सगळे मिळून एका मित्रत्वाच्या नात्याने मस्त सहजीवन अनुभवू शकतात.
- सचिन (8424041159)
(तुमचे सुद्धा असे काही अनुभव असतील किंवा या लेखांविषयीचे तुमचे मत, प्रतिक्रिया असेल तर नक्की शेअर करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध