घरकाम- 2

                                                                     घरकाम- 2

घरकाम हे अत्यंत जबाबदारीचं काम अपवाद वगळता सर्रास सर्व घरांमध्ये स्त्रियाच करत असतात. शिवाय हे सातत्याने करत राहण्याचं काम. याला सुट्टी कधी नसतेच. म्हणजे तिला कितीही कंटाळा आला तरी उठून सर्वांसाठी जेवण बनवावंच लागतं. समजा, एखाद्या घरात कधी अशा वेळी जेवण बनवायला सुट्टी देऊन बाहेरून काही मागावण्याचा पर्याय असलाच तरी त्यावर बाहेरचं खाणं कसं चांगलं नाही आणि घरात बनवलेलंच खायला आम्हाला कसं आवडतं असं बरंच काही ऐकावं लागतं. आणि त्यानंतरही जेवणाचं एकवेळ भागवलं, पण बाकी झाडू मारणे, लादी पुसणे, भांडी घासणे, कपडे धुणे या गोष्टी राहतातच की. यातली एकही गोष्ट न करता जर एखाद्या स्त्रीचा पूर्ण दिवस जाऊ शकला तर याचा अर्थ एकतर ती खूपच जास्त आजारी आहे किंवा ती आता सासू झालीय किंवा ती अजून आई-बाबांची लाडाची मुलगी आहे किंवा तिच्या घरात तिच्या शिवाय हे कामं करू शकणारी दुसरी कोणीतरी स्त्री आहे. इतकं हे काम अत्यावश्यक व स्त्रियांवर बंधनकारक झालेलं आहे, पण याची जाणीव किती जणांना आहे हा मोठा प्रश्नच आहे. शिवाय एवढं सगळं करून याचं कौतुक नाही, याचा पगार नाही, याची प्रशंसा नाही किंवा साधा याचा उल्लेख सुद्धा जाणीवपूर्वक कधी कोणी करत नाही. कारण यात काय विशेष? हे तर रोजचंच काम असतं ना? असाच सगळा आविर्भाव असतो. एक दिवस जर घरातल्या पुरुषाने साधा चहा किंवा कॉफी बनवली तर त्याचं काय मोठं काम केल्यासारखं कौतुक होतं, पण घरातील स्त्रिया कित्येक दिवसांपासून घरातलं सगळं नित्यनेमाने न चुकता करत आल्यात त्याचं मात्र कौतुक कुणालाच नसतं. अर्थात त्याची जाणीव होण्यासाठी आधी त्यांच्या जागेवर राहून बघायला हवं. कधी ठरवून पुरुषांनी आठवडाभर घरातील स्त्रियांची सर्व कामं स्वतःकडे घेऊन पाहिली तर मग लक्षात येईल कि ही जबाबदारी किती मोठी असते. घरात सर्वजण गप्पा मारत बसलेले असताना, गप्पा रंगात आलेल्या असताना उठून सर्वांसाठी चहा करून आणणे इथपासून तर जबाबदारीने रोज सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणाचा, रात्रीच्या जेवणाचा विचार करणे, त्याची कोणी न सांगताच आणि कुणाची वाट न पाहताच एकटीने तयारी सुरू करणे, जेवणानंतर लगेच आराम करत न बसता भांड्यांचा गराडा समोर घेऊन बसणे, घरातील सर्व साफ सफाई जबाबदारीने वेळेवर करणे, मुलांची जबाबदारी सांभाळणे, घरातील इतरांची आजारपणं किंवा इतर काही कामं असतील ती सांभाळणं आणि शिवाय एवढं सगळं करून याबद्दल कुणाकडून काहीच कौतुक न मिळणे, उलट काही ना काही दोषच काढले जाणे, त्यावरून बोलणे ऐकून घ्यावे लागणे आणि एवढं सगळं होऊन पुन्हा त्याच कामांना कुणीही न सांगता, कुणाचीही वाट न पाहता स्वतःच जबाबदारीने सुरुवात करणे.
याची किमान जाणीव असणं आणि त्या जाणिवेतून या अत्यंत महत्वाच्या, मोठ्या जबाबदारीबद्दल किमान कृतज्ञ भाव असणं हे तर साध्या माणुसकीचं लक्षण आहे. किमान तेवढं तरी आपल्यात आहे का हे माणूस म्हणवून घेणाऱ्या आपण प्रत्येकाने प्रथम तपासायला हवं.
- सचिन (8424041159)
(तुमच्या या संदर्भातील प्रतिक्रिया, मत, सूचना, अनुभव, शेअरिंग माझ्या वर दिलेल्या व्हाट्सअप्प नंबर वर मेसेज करून देऊ शकता.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध