पझेसिव्हनेस- 1 - आपले संस्कार
लहानपणापासून आपल्यावर असंख्य गोष्टींचे संस्कार होत असतात. ते घेत घेतच आपण मोठे होत असतो. ज्यावेळी आपल्या स्वतःच्या स्वतंत्र विचारक्षमता विकसित होतात, तेव्हा काही जणांना आपल्यावर झालेले काही चुकीचे किंवा नकारात्मक संस्कार लक्षात येतात आणि आपल्या अभ्यासाने प्रयत्नपूर्वक ते यातून बाहेर पडायचा प्रयत्न करतात, त्यातले अनेकजण पडतात देखील आणि बाकीचे त्या प्रयत्नांच्या दिशेने वाटचाल करत राहतात; तर काहीजण ते प्रयत्न म्हणजे डोक्याला ताप समजून सोडून देऊन, आहे त्यातच समाधान मानतात. पण किमान ते त्यांच्या लक्षात तरी येतात. काहीजणांच्या हे लक्षात पण येत नाही आणि मग ते 'माझं जे आहे तेच बरोबर आहे' असं समजून रेटून जगत असतात, ज्याचा त्यांना स्वतःला व आजूबाजूच्या इतरांना सुद्धा त्रासच होण्याची शक्यता जास्त असते. असाच यातला एक संस्कार म्हणजे 'पझेसिव्हनेस'. पझेसिव्हनेस हा संस्कार कसा असेल? असाही प्रश्न कित्येकांना पडेल. पण आपण थोडा बारकाईने विचार केला तर लक्षात येईल कि हा स्वभाव काय एकदम अचानक आपल्यात तयार झालेला असतो असं नाही, तर अगदी लहानपणापासून आपल्या मनामध्ये तो नकळतपणे बिंबवला जातो. आठवून बघा ना त्या लहान बाळांचा निरागस चेहरा, जेव्हा त्यांना पहिल्यांदा (अगदी पहिल्यांदा हां) कोणीतरी प्रश्न विचारतं 'बाळा, आई (किंवा मम्मी) कुणाची?' किंवा 'पप्पा कुणाचा?' तेव्हा त्यांचा चेहरा किती निरागस असतो? काय बोलावं हे त्यांना कळतच नसतं. त्यावर मग आजूबाजूचे लोकं त्यांना सांगतात कि 'आई (मम्मी) माझी', 'पप्पा माझा' आणि मग त्यांना कळतं कि आपण असं म्हणायचं असतं. तिथून पुढे त्यांना कधीही कुणीही हे प्रश्न विचारले तरी ते 'माझा/माझी/माझं' असंच म्हणू लागतात आणि यातूनच हळूहळू तशा जाणिवा तयार होतात. हे जसं माणसांबद्दल, तसंच पुढे मग वस्तूंबाबत पण होत जातं. ही वस्तू माझी आहे आणि ही कुणाला घेऊ द्यायची नाही हे विचार सुद्धा मुलांमध्ये नकळतपणे पालक किंवा आजूबाजूचे नातेवाईकच घालत असतात. त्यातूनच पुढे मुलांमध्ये स्वतःच्या मालकी हक्काची जाणीव तयार होत जाते आणि मग मला जे जे हवं ते माझ्याकडे असायला हवं आणि माझ्याकडे जे जे आहे त्यावर फक्त माझाच अधिकार आहे आणि ते माझ्यासाठीच आहे ही भावना अधिक तीव्र होत जाते. ही माझं, माझ्यापुरतं, माझ्यासाठीच ही भावना आपणच मुलांमध्ये तयार करत असतो. मग ती गोष्ट मला मिळाल्याने किंवा मी घेतल्याने किंवा मी न दिल्यामुळे समोरची मुलं रडत असतील तरी मुलं आपली वस्तू द्यायला तयार होत नाहीत इतकी ही स्व-मालकीची भावना नकळतपणे मुलांना निगरगठ्ठ बनवत जाते. यासोबतच ही भावना मुलांना अति भावनिक, भावनिकदृष्ट्या कमकुवत किंवा परावलंबी सुद्धा बनवत जाते. आईला सोडून अजिबातच न राहणारे ममाज बॉय व वडिलांना जराही न सोडणाऱ्या पपाज गर्ल तर पुढे जाऊन यातून आई-बाबांबद्दल प्रचंड पझेसिव्ह होऊन जातात. यामध्ये नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये जन्मतःच असणारे विरुद्ध लिंगी आकर्षण हे महत्त्वाचे कारण जरी असले तरी आपल्याकडून नकळतपणे घडणारे संस्कार मुलांमधील हा पझेसिव्हनेस अधिक तीव्र करतात. यात अनेकजण गंमत म्हणून सर्रासपणे मुलांना 'आई तुला सोडून चालली बघ' किंवा 'बाबा तुला सोडून निघाला' असं म्हणून मग 'कशी मुलं मागे लागतायत' याबाबत मुलांची गंम्मत बघत असतात; पण हीच गंमत नकळतपणे मुलांच्या बालमनावर काय संस्कार करतेय याचा विचार देखील यावेळी आपल्या मनात येत नाही. याच संस्कारांमुळे पुढे मग आई-बाबा सोडून जातील किंवा दूर जातील किंवा त्यांना सोडून दूर राहायचंय हा विचार सुद्धा अनेकांना सहन होत नाही.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा