हिंसा-अहिंसा - भाग-1
नुकतेच महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या 'हिंसा के खिलाफ मानवता कि ओर' या अभियानांतर्गत मुंबई जिल्ह्याच्या वतीने डॉ. सागर मुंदडा यांचे *हिंसेची मानसिकता व तरुणाई* या विषयावर व्याख्यान आयोजित केले होते. त्यानंतर लगेच मैत्री कट्ट्यावर पण *हिंसा-अहिंसा* हा विषय चर्चेसाठी घेतला. त्यानिमित्ताने काही सुचलं ते लिहिण्याचा प्रयत्न केला आहे.
हिंसा म्हटलं कि तिचे अनेक प्रकार आपल्या समोर येतात. जसे कि अनेक माणसांच्या एखाद्या समूहाने एखाद्या माणसाला किंवा माणसांच्या दुसऱ्या समूहाला मारणे, एका माणसाने दुसऱ्या माणसाला किंवा माणसांच्या समूहाला मारणे इत्यादी. मग त्याची कारणे पुन्हा वेगवेगळी असतात. कुणी जात, धर्म, प्रांत, प्रतिष्ठा या नावाने, कोणी चोरी-दरोड्याच्या कारणाने, कोणी अंधश्रद्धेच्या तर कोणी भीती वा अफवांच्या आहारी जाऊन अशा हिंसा करतात.
कोणी इतर वैयक्तिक कारणातून एकमेकांची हिंसा करतात, तर कोणी प्रेमाच्या नावाने हिंसा करतात. कोणी अधिकार गाजवण्यासाठी करतात, तर कोणी स्वतःला सिद्ध करण्यासाठी करतात. कोणी बचावासाठी करतात, तर कोणी बदला घेण्याच्या भावनेतून करतात. कोणी गरजेपोटी, परिस्थिती पोटी करतात तर कोणी लालसेपोटी करतात. कोणी भीतीतून करतात तर कोणी भीती वाढवण्यासाठी करतात. कोणी आपल्या लैंगिक इच्छा भागवण्यासाठी समोरच्यावर जबरदस्ती करून हिंसा करतात, तर कोणी आपला इगो दुखावला म्हणून सुद्धा हिंसा करतात. काही मानसिक विकृतीतून सुद्धा हिंसा घडतात. अनेकदा काहीजण स्वतःच्या राजकीय हितासाठी या हिंसा घडवून सुद्धा आणतात. अर्थात या फक्त माणसाने माणसाच्या केलेल्या हिंसा झाल्या. यात पुढे जाऊन माणसाने प्राण्यांच्या, वनस्पतींच्या, निसर्गाच्या केलेल्या हिंसा यांचा सुद्धा समावेश होतो.
इथे हिंसा म्हणजे प्रत्येक वेळी फक्त खून करणे, जीव घेणे एवढाच अर्थ होत नाही तर जाणीवपूर्वक शारीरिक, मानसिक इजा पोहोचवण्याच्या कृती सुद्धा हिंसेमध्येच मोडतात हे लक्षात घ्यायला हवं.
ही हिंसक वृत्ती येते कुठून? याच्या मागची नेमकी कारणे काय असावीत? हिंसक असणे हा माणसाचा नैसर्गिक स्वभाव आहे का? या हिंसेला थांबवायचं कसं? असे अनेक प्रश्न याला धरून पुढे येतात.
यातील पहिला प्रश्न - ही हिंसा येते कुठून व हिंसा नैसर्गिक आहे का? यावर आधी बोलूयात पुढच्या लेखात.
सचिन (8424041159)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा