शेअरिंग केअरिंग- 1 - प्रस्तावना

 'घरकाम' व 'पझेसिव्हनेस' या दोन्ही लेखमालांना तुमचा भरभरून प्रतिसाद मिळाला. त्याच दरम्यान आणखी काही विषयांवर लिहिण्याच्या शिफारशी, सूचना व विनंत्या येत होत्या. माझ्याही मनात आणखी काही विषय होते, पण यातील सगळ्यांवर स्वतंत्र व सलग लिहायचं म्हटलं तर एका विषयावर खूप वेळ जाणार आणि इतर विषय लांबणीवर पडणार. त्यातून मुळात लिहिण्याचा माझा वेग पाहता यातील अनेक विषयांपर्यंत पोचणंच होणार नाही हे लक्षात आल्याने जरा लिहिण्याचा फॉर्म बदलावा असं वाटत होतं. त्यात गेले काही दिवसात घडणाऱ्या घडामोडींतून बरेच विचार माझ्या डोक्यात सतत येत होते. त्यात सुशांत सिंग प्रकरण व त्यातून आत्महत्या या विषयावर सुरू झालेली चर्चा, मानसिक कोंडी व एकटेपणाचा ताण याची दिसणारी अनेक उदाहरणे आणि त्यात लॉकडाऊन मुळे पडलेली भर, तसेच या दरम्यान काही मित्र-मैत्रिणींशी मैत्री, प्रेम, लग्न, सेक्स, पालकत्व या सगळ्या विषयांवर झालेल्या गप्पा यावर अधिक विचार करून एक फॉर्म सुचला आणि एकदाची सुरुवात करावी असं ठरवलं.

याला एक मस्त नावही सुचलं- 'शेअरिंग केअरिंग'. म्हणजे नावाप्रमाणेच यामध्ये माझ्या मनातील काही गोष्टी तर शेअर करणं आलंच; पण त्याचबरोबर तुमच्यापैकी अनेकांनी माझ्याशी शेअर केलेल्या काही गोष्टी किंवा अडचणी, प्रॉब्लेम (ज्या बऱ्याचदा इतर अनेकांना पण येत असतात) इतर अनेकांपर्यंत पोचवण्याचे काम यातून करायचे व त्यावर येणाऱ्या प्रतिक्रियांमधून या सर्वांचे व माझेही काही अनुभव, विचार, मतं जे इतरांच्या कामी येऊ शकतील आणि जे अर्थातच त्यांच्या काळजी (केअरिंग)मधूनच आलेले असतील, ती पुन्हा सर्वांपर्यंत पोचवण्याचे काम करता येईल. यात आपले काही विचार शेअर करून इतर कुणाची केअर करता आली तर भारीच असेल ना.
अर्थात यात सगळेच विषय मला घेता येतील असं नाही, पण माझ्या मर्यादेत मला जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच घेण्याचा प्रयत्न असेल. यात यावेळी एकच विषय सलग असेल असंही नाही. जसा जो विषय सुचेल किंवा माझ्यापर्यंत पोचेल आणि त्यावर लगेच लिहावं वाटेल अशा विषयांवर लिहिलेलं असू शकतं. पण त्या विषयासमोर दिलेल्या क्रमांकामुळे त्या विषयाच्या आधीच्या लेखांची लिंक लागू शकेल.
यात कधी एखाद्याला एखादा लेख 'माझ्याबद्दलच लिहिलंय कि काय?' असं वाटण्याइतका स्वतःशी जुळणारा वाटेल, कधी तो आपल्या संपर्कातील कुणाशी तंतोतंत जुळतोय असं वाटेल, कधी तो अजिबातच आपल्या कुणाशी जुळतोय असं एखाद्याला वाटणार नाही तर कधी तो 'मी माझ्याबद्दलच तर लिहिला नाही ना', असंही काहींना वाटू शकतं. असं वाटणं ही त्या लेखाला मिळालेली पोच पावती असेल. कारण हे असं अनेकांच्या अनुभवात साम्य असणं किंवा कुणाच्या अनुभवात अजिबातच साम्य नसणं हे वास्तव आहे. तर असं हे सगळं तुमचं वाटणं नक्की शेअर करा. यात अर्थातच कुणाचीही ओळख परवानगी शिवाय व इच्छेशिवाय जाहीर केली जाणार नाही हे नक्की. त्यामुळे तुमच्या मनातील विचार तुम्ही माझ्याशी मोकळेपणाने शेअर करू शकता व तुमची मते, अनुभव व प्रतिक्रिया सुद्धा नक्की शेअर करू शकता.
मग काय म्हणता?
होणार ना सहभागी आपल्या *'शेअरिंग- केअरिंग'* मध्ये?
- सचिन (8424041159)
(आपले मतं, प्रतिक्रिया, अनुभव व्हाट्सअप्प वर पाठवू शकता.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध