पझेसिव्हनेस 19 - प्रतिक्रिया, मतं, अनुभव

पझेसिव्हनेसची सिरीज सुरू होऊन आता जवळपास दीड महिना उलटून गेला. ही लेखमाला सुद्धा अनेकांना खूप आवडली व आवडत आहे हे येणाऱ्या प्रतिक्रिया मधून जाणवतंय. तरीही या प्रतिक्रिया घरकामाच्या लेखांना येणाऱ्या प्रतिक्रियांपेक्षा वेगळ्या आहेत हे लक्षात आले. घरकामाच्या लेखांमुळे अनेकजण प्रत्यक्ष कृतिशील होऊन कामाला लागले हे रोज अनेकांचे स्वानुभव व प्रत्यक्ष प्रयोग खूप उत्साहाने माझ्यापर्यंत व पुढच्या लेखात सर्वांपर्यंत पोचत असल्याने लक्षात येत होतं; तसं इथं होताना दिसत नाहीये. इथंही प्रतिक्रिया भरपूर आहेत, पण यात स्वानुभव सांगताना अवघडलेपणा आहे. त्यामुळे अनेकजण लेख आवडल्याचे सांगतात, पण त्याविषयी अनुभव फार कमी जण सांगत आहेत. यातून एक लक्षात आलं कि पझेसिव्हनेस हा खूप जवळचा भाग आहे प्रत्येकाच्या. शिवाय तो जवळच्या व्यक्तीच्या बाबतीतच असतो. त्यामुळे त्याविषयी अधिक काही शेअर करणं म्हणजे आपल्या जवळच्या व्यक्तीच्या किंवा तिच्या बद्दलच्या आपल्या भावना यांच्याशी प्रतारणा केल्यासारखे वाटते. परवा माझा एक मित्र बोलताना हेच सांगत होता कि त्यालाही हे लेख वाचल्यावर त्याचे पझेसिव्हनेस विषयीचे अनुभव सांगावेसे वाटत होते, जे तो रोज अनुभवतोय; पण अर्थात ते त्याच्या जवळच्या व्यक्ती विषयी असल्याने त्याला सांगणं जमत नाहीये. असेच इतरही काही जणांचे मेसेज होते ज्यात त्यांना असे अनुभव आजूबाजूला आले आहेत किंवा येत आहेत असं त्यांचं म्हणणं होतं. आत्तापर्यंत पझेसिव्हनेसच्या सिरीज मध्ये अगदी लहानपणापासूनच्या जवळपास सर्व जवळच्या नात्यांबद्दल लिहायचा प्रयत्न केला आहे. काही राहिलेच असतील तर त्या नात्यांमध्ये सुद्धा या लेखांतील गोष्टी लागू होऊ शकतील. यात अगदी आई-वडील व मुलांच्या नात्यापासून तर पुढे भाऊ-बहिण, मित्र-मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी व जोडीदार या सर्व नात्यांबद्दलच्या पोस्टला वाचकांचा प्रतिसाद मिळाला व त्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा मिळाल्या. यात जवळपास सर्वच नात्यांच्या बाबतीत तसे प्रत्यक्ष अनुभव घेतला असल्याचे मेसेज येत होते. काहीजण हे लेख वाचून स्वतःमध्ये आता बदल करत आहेत असं म्हणत होते, तर काहीजण या लेखांमुळे आपली चूक उमगल्याचे सांगत होते. काहीजणांना त्यांच्या बाबतीत घडलेल्या घटनांचे अर्थ लावण्यास या लेखांमुळे मदत झाली असे त्यांचे म्हणणे होते. हा विषय कुणाशी शेअर करणं अवघड आहे हे जाणवत होतं, त्यामुळे वैयक्तिक अनुभव सांगायला अडखळत आहेत अनेकजण. पण असं असलं तरी अनेकांनी आपले अनुभव कुणाचेही नाव न सांगता शेअर केले. काहीजणांनी तर स्वतःचे नाव सुद्धा सांगितले नाही आणि त्यांच्या कम्फर्ट च्या दृष्टीने मी त्यांना ते विचारले पण नाही. यात मुलांवर संस्कार करताना या गोष्टींपासून कसे दूर ठेवायचे याविषयी बोलणारे पालक होते, त्याचवेळी पालकांकडून अशा पद्धतीने पझेसिव्ह वागण्याचे अनुभव येणारे मुलं ही होते. काही मुलांनी त्यांच्या कॉलेज जीवनातील मित्र-मैत्रिणींमधील याबाबतचे किस्से सांगून आपण कसे कुठे चुकलो हे आता लक्षात आल्याचे सांगितले, तर काहींनी आपले मित्र-मैत्रिणी कसे आपल्या बाबतीत पझेसिव्ह होते हे सांगितले. यातून बाहेर पडण्यासाठी यातल्या काहीजणांनी आता प्रत्यक्ष काही कृतीतून प्रयत्न सुद्धा सुरू केल्याचे सांगितले. एकाने त्याच्या मित्राला सारखे मेसेज व कॉल करणे व त्याचे लवकर रिप्लाय आले नाहीत म्हणून चिडणे हे दोन्ही प्रकार जाणीवपूर्वक कमी केल्याचे सांगितले. एकाने त्याच्या मित्रांना हे लेखच पाठवून दिले आणि मग त्यांच्याशी त्यावर बोलला. याचा परिणाम होईल अशी त्याला आशा असल्याचे सांगितले. प्रियकर-प्रेयसी मधले असे अनुभव शेअर करणे जरा जास्तच अवघड असतं; पण तरी काहीजणांनी ते सांगितले व त्यामुळे त्यांच्या नात्यात असणारा तणाव आणि त्यामुळे त्यांचा उडालेला गोंधळ ही सांगितला. लग्नानंतर च्या जोडीदाराविषयी असे काही शेअर करणे हे तर या सगळ्यात जास्त अवघड असल्याने प्रत्यक्ष ते अनुभव फारसे पोचले नाहीत. पण अप्रत्यक्षपणे- हे असं होतंय, अगदी परफेक्ट लिहिलंय, एकदम बरोबर अशा कमेंट्स होत्या. त्यातल्या काहीजणांनी जे शेअर केले त्यांचे म्हणणे तर होते कि- हे अगदी तंतोतंत जुळतंय. तुम्हाला हे सगळं कसं कळलं असंच वाटलं मला वाचताना. पझेसिव्हनेस मधून असुरक्षितता वाटत असल्याने सारखे जोडीदारावर लक्ष ठेवून राहणे, त्याचे फोन चेक करणे, सारखे फोन करून अपडेट घेत राहणे, जोडीदार आपल्याला सोडून तर जाणार नाही ना या भीतीने सतत तणावाखाली राहणे इथपासून तर अगदी त्याचा सेक्स वर होणारा परिणाम व त्याचे पुन्हा लावले जाणारे अर्थ इथपर्यंत बरंच काय पोचलं. या सगळ्यामध्ये काहींचा फक्त मनातील भावना शेअर करणे हा उद्देश होता, तर काहीजणांना यावर उपाय हवे होते. समोरच्याचे ऐकून घेणे हा तर माझा पहिल्यापासून खूप चांगला गुण राहिला असल्याने मला ते खूप सोपं होतं. पण यावर उपाय सांगणे हे सगळीकडेच माझ्या क्षमतेमध्ये बसणारं नाही याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यामुळे जिथे अगदी सहज शक्य आहे तिथेच मी काही मला वाटणाऱ्या गोष्टी सुचवल्या व जिथे गरज आहे तिथे समुपदेशक व मानसतज्ञांना भेटण्याचे सल्ले सुद्धा दिले.

अर्थात हे सांगण्याचं कारण फक्त एवढंच कि या लेखांचा काही प्रमाणात का होईना उपयोग होतोय हे लक्षात आलं. यातले प्रतिक्रिया देणारे अनेकजण मला अनोळखी आहेत. रोज हजारो लोकांपर्यंत हे लेख पोचयतायत व कुठेतरी काहीतरी याचा चांगला परिणाम होतोय याच्याहून मोठे समाधान ते काय!!!
या लेखमालेच्या शेवटाकडे जाण्याआधी या सर्व प्रतिक्रियांचा उल्लेख करणे मला गरजेचे वाटले. या लेखांचे अनेकजण रेग्युलर वाचक आहेत आणि दोन दिवस लेख आले नाहीत तर लगेच मेसेज करून पुढचा लेख कधी येणार हे ते विचारत असतात. तुम्हां सर्व वाचकांच्या या विश्वासामुळेच लिहिण्याचे बळ मिळत असते.
- सचिन (8424041159)
(अजून काही लेख बाकी आहेत. शेवटच्या लेखामध्ये तसा स्पष्ट उल्लेख केला जाईल.😄 तोपर्यंत तुमचे काही मत, अनुभव, प्रतिक्रिया असतील तर नक्कीच मेसेज करा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध