पझेसिव्हनेस 17 - मीच सर्वांत बेस्ट फ्रेंड

लग्नानंतर माझ्या जोडीदाराने फक्त माझ्यावरच प्रेम करावं अशी अनेकांची इच्छा असते. माझ्याशिवाय त्याची किंवा तिचा कोणी बेस्ट फ्रेंड असू नये असंही त्यांचं म्हणणं असतं. म्हणजे लग्नाआधी तुमचं काय असेल ते असेल, त्याच्याशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. म्हणजे लग्नाआधीच्या तुमच्या कोणत्याही नात्यावरून आम्ही त्रास देणार नाही इतका उदारपणा आम्ही दाखवू, पण लग्नानंतर मात्र मग तुमचे आमच्याशिवाय इतर कोणी जवळचे मित्र-मैत्रिणी नसावेत एवढीच अपेक्षा असते. या एकमेव कारणामुळे लग्नानंतर अनेक मुलांच्या मैत्रिणी व मुलींचे मित्र कमी झालेले दिसतात. मुलींचे तर फेसबुक अकाउंट सुद्धा बदलतात आणि मोबाईल नंबर सुद्धा बदलतात. इतका प्रचंड पझेसिव्हनेस जोडीदाराच्या बाबत ठेवून आम्ही तुमच्यावर भरपूर प्रेम करू, तुम्हाला इतर कुणाची गरज पडू देणार नाही, मग काय हरकत आहे तुम्हाला पण फक्त आमच्यासाठी एवढं करायला? असं म्हणणं असतं.

आता एखाद्याला असं ठरवून बेस्ट फ्रेंड बनवता येतं का? आणि असणाऱ्या बेस्ट फ्रेंड्स ना असं अचानक सोडून किंवा विसरून जाता येतं का? या साऱ्या गोष्टींचा मात्र इथं विचार केला जात नाही.
'माझा/माझी जोडीदार हा/ही फक्त माझा/माझी आहे' अशा पद्धतीने जोडीदारावर मालकी दाखवून जोडीदाराला बांधून ठेवण्याचे प्रयत्न अनेकदा होताना दिसतात. 'माझा जोडीदार हा/ही माझ्या सर्वांत जवळची व्यक्ती आहे' असं वाटणं आणि 'माझा जोडीदार हा/ही *फक्त माझ्याच* जास्त जवळची व्यक्ती असावी असं वाटणं' यात प्रेमाकडून पझेसिव्हनेस कडे होणारा प्रवास स्पष्ट दिसतो.
आपला जोडीदार हे एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व असून त्यांचे स्वतःचे आपल्या व्यतिरिक्त मित्र-मैत्रिणी असू शकतात आणि ते त्यांच्यासोबत आपल्या शिवाय सुद्धा मनसोक्त आयुष्य जगू शकतात ही एकमेकांची स्पेस इथे मान्य होताना दिसत नाही. अनेकदा वरवर ही स्पेस मान्य असल्याचे सांगितले जाते, पण जेव्हा त्याला त्याच्या मैत्रिणींचे फोन यायला लागतात तेव्हा इकडे कटकट वाढायला लागते किंवा तिच्या मित्रांच्या फोनवरून घरात वाद वाढायला लागतात. मित्र-मैत्रिणींच्या मेसेजेस व फोन कॉल्स वरून संशय वाढायला लागतात आणि मग घरात वाद सुरू होतात. या सगळ्याचे मूळ पझेसिव्हनेस मध्ये व एकमेकांची स्पेस मान्य नसण्यामध्येच असते. काही ठिकाणी मित्र-मैत्रिणी असण्याला काही हरकत नसते, पण मग त्यांच्याशी कसं बोलावं, किती बोलावं, कधी बोलावं याविषयी निर्बंध असतात. म्हणजे अनेकदा असंही असतं कि 'माझ्याशी कधी एवढं प्रेमाने बोलत नाही आणि हिच्याच बरोबर बोलताना बरं एवढं प्रेम उफाळून येतं?' 'माझ्यासोबत बोलायला हिला बोअर होतं आणि याच्यासोबत बरं तासनतास बोलायला जमतं?' 'सगळे एकत्र फिरायला गेल्यावर मला भूक लागलीय का हे कधी स्वतःहून विचारत नाही आणि हिच्या भुकेची मात्र बरी याला एवढी काळजी असते?' इथपासून तर मग 'हिला कळत नाही मुलं कशी फसवतात ते?' किंवा 'मुली आपल्या फायद्यापुरतं मुलांना जाळ्यात ओढत असतात हे याला कळत नाही' इथपर्यंत सगळं काही व्हायला लागतं. मग पुढे एकमेकांच्या प्रमाणिकपणाबद्दलच अविश्वास वाटायला लागतो. आणि चांगल्या नात्याला ग्रहण लागायला सुरुवात होते.
हे होऊ नये म्हणून सर्वप्रथम एकमेकांचे स्वतंत्र अस्तित्व मान्य असायला हवे व एकमेकांची स्पेस सुद्धा दोघांनी मिळून जपायला हवी. त्यासाठी नात्यात एकमेकांबद्दल विश्वास असायला हवा आणि तो टिकेल व वाढेल असे प्रयत्न दोघांनीही करत राहायला हवेत.
- सचिन (8424041159)
(तुमचेही काही अनुभव, मतं, प्रतिक्रिया तुम्ही मला व्हाट्सअप्प वर किंवा फेसबुकवर शेअर करू शकता.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध