पझेसिव्हनेस 15 - लग्नानंतरचा पझेसिव्हनेस

आपल्याकडे लग्न ही व्यवस्थाच जवळपास पुरुषप्रधान व्यवस्थेच्या समर्थनातून किंवा ती जोपासण्याच्या हेतूनेच समाजात रूढ असल्याचे सामान्यतः चित्र आहे. त्यामुळे मालकी हक्क हा त्याचा अविभाज्य भागच असतो आणि तो या व्यवस्थेने नेहमी पुरुषांच्या हातात दिलेला असतो. म्हणूनच सत्तेचा कंट्रोल, सवलती या पुरुषाच्या हातात व स्त्रियांच्या मात्र गळ्यात, हातात, पायात आणि अनेकदा मनात सुद्धा बंधनं च असतात. पण आपण या स्वरूपाच्या पझेसिव्हनेस बद्दल सध्या बोलत नसून प्रेम, काळजी या सकारात्मक भावनांतून येणाऱ्या पझेसिव्हनेस बद्दल बोलत आहोत.

लग्नानंतर दोन जोडीदार जेव्हा एकमेकांच्या आयुष्याचा सर्वात जवळचा भाग बनतात, तेव्हा तर हा पझेसिव्हनेस इथं येण्याची शक्यता अधिक जास्त असते.
दोन जोडीदारांच्या आयुष्यात जेव्हा हा पझेसिव्हनेस येतो, तेव्हा हे रोजचं दुखणं वाटायला लागतं आणि याच्यापासून पिच्छा सोडवणं फारच अवघड होऊन बसतं . म्हणजे माझ्या जोडीदाराने माझ्या मर्जीनेच वागायला हवं असं काहींना वाटत असतं. त्यातून ते सतत जोडीदाराच्या मागे कटकट लावत असतात. मी तर माझ्या एका मैत्रिणीला तिच्या जोडीदाराला असं समोर उभं करून ब्रश करायला लावताना पाहिलंय. आणि त्यात अगदी बारकाईने निरीक्षण करून ती नेमका कसा ब्रश करायचा हे त्याला शिकवायची. म्हणजे तिच्या मते एवढ्या दिवसांत तो बिचारा साधं स्वतःचा ब्रश करणं सुद्धा नीट शिकलेला नव्हता कि काय? तर कधी कधी आपल्या जोडीदाराच्या बाबत आपण इतके पझेसिव्ह होतो कि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सुद्धा आपल्याला जोडीदाराच्या चुका दिसायला लागतात आणि जोडीदाराच्या या छोट्या सुद्धा चुका सुधारणे म्हणजे आपल्या आयुष्याचे परमकर्तव्य वाटायला लागते. मला तर वाटतं, आपल्या आयुष्यात सगळ्यात जास्त सल्ले सुद्धा आपण आपल्या जोडीदारालाच देत असू.
काही अशाही महान व्यक्ती आपल्याला भेटतात ज्यांनी आपल्या जोडीदाराला सुधारणे हे आपल्या आयुष्याचे ध्येय म्हणून ठरवलेले असते. आणि त्यामुळे जोपर्यंत जोडीदार आपल्या अपेक्षेप्रमाणे सुधारत नाही तोपर्यंत त्यांच्यामागे यांचा धोशा लागूनच राहतो. त्यामुळे अनेकदा घरात भांडणं सुद्धा होत राहतात. खरंतर लग्न करून मग जोडीदाराला सुधरवणे हे इतिकर्तव्य मानण्यापेक्षा आधीच आपल्या अपेक्षेप्रमाणे असणारीच व्यक्ती जोडीदार म्हणून शोधली तर पुढच्या आयुष्यभरासाठी दुसरे अधिक योग्य व उत्तम ध्येय ठरवता येऊ शकते.
पण ज्यांचे आयुष्य आता या निर्णयाच्या बरेच पुढे गेले आहे, म्हणजे निवडीची पहिली संधी कधीच संपलेली आहे आणि दुसऱ्या संधीची तर काय आता फारशी शक्यता नाही, त्यांनी बिचाऱ्यांनी काय करावं बरं?
- सचिन (8424041159)
(तुमचेही अनुभव, मतं, प्रतिक्रिया शेअर करू शकता. नावांचा उल्लेख टाळू शकतो आपण😄)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध