पझेसिव्हनेस 14 - 'प्यार कभी किसी को बरबाद नहीं करता..'
अनेकदा पझेसिव्हनेस ची भावना ही एकतर्फी नात्यात सुद्धा असते बरं का. म्हणजे दोन मित्र-मैत्रिणींमध्ये एकाचे दुसऱ्यावर प्रेम आहे, पण ते दुसऱ्याला माहीतही नाही किंवा माहीत असले तरी त्याचे प्रेम नाही अशा ठिकाणी सुद्धा पझेसिव्हनेस येऊ शकतो. अनेकदा ते एकमेकांचे मित्र-मैत्रिणी असावेत याचीही गरज नसते. अशा ठिकाणी सुद्धा एकतर्फी प्रेमातून पझेशन तयार होऊ शकते. अशा वेळी सुद्धा आपली प्रिय व्यक्ती नेहमी आपल्या नजरेसमोर असावी, त्यासाठी तिला सतत फॉलो करणं, तिच्या जवळ येण्याचा इतर कोणी प्रयत्न तर करत नाही ना यावर लक्ष ठेवणे आणि इतर कोणी तिच्या जास्त जवळ जाऊ नये यासाठी प्रयत्न करणे अशा गोष्टी घडत असतात. कॉलेजमध्ये अशा एकतर्फी प्रेमातून येणाऱ्या पझेशन मधून अनेक मुला-मुलींची भांडणे, मारामाऱ्या होत असतात. यात अनेकदा त्या समोरच्या व्यक्तीला माहितीही नसते कि हे आपल्यावरील प्रेमामुळे कोणीतरी करतंय. याच्या पुढची स्टेज ही आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्याशिवाय इतर कोणी आवडूच नये असं वाटण्याची. मग अनेकदा त्यांच्या मित्र-मैत्रिणींमध्ये काहीतरी गैरसमज पसरवायचा प्रयत्न करणं, त्यांच्यात भांडणं लावणं असे प्रकार सुद्धा सुरू होतात. याचे टोक म्हणजे 'तू माझा झाला नाहीस तर कुणाचाच होऊ शकत नाही' किंवा 'माझी झाली नाही तर इतर कुणाचीच होऊ देणार नाही' अशी भावना तयार होणे. ही भावना जेव्हा तीव्र होते, तेव्हा यातील प्रेम संपून फक्त पझेशन, मालकी भाव शिल्लक राहतो आणि समोरच्या व्यक्तीला कोणत्याही मार्गाने मिळवण्याचे प्रयत्न सुरू होतात. समोरच्याची इच्छा, भावना याचा कसलाही विचार न करता तिला मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. यात यश मिळत नाही असे दिसले की मग कोणी स्वतःला त्रास करून घेते, तर कोणी समोरच्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात. ही मानसिक आजारपणाची अवस्था असते. यावर योग्य वेळीच उपचार घेणे गरजेचे असतात. याच्याही पुढे जर कोणी गेले तर ती व्यक्ती मानसिक आजारातून विकृती कडे वळू शकते आणि त्यातून समोरच्या व्यक्तीला इजा करणे, त्याचा जीव घेण्यापर्यंत ही विकृती जाऊ शकते. या अवस्थेत प्रेमाचा लवलेशही शिल्लक राहिलेला नसतो. ज्याला ती व्यक्ती प्रेम समजत असते ते प्रेम कधीच संपून त्याचा प्रवास पझेशन मधून मानसिक आजाराकडून मानसिक विकृतीकडे झालेला असतो. आपल्याकडे अशा मानसिक विकृतीच्या अवस्थेतून अनेक हिंसेचे व आत्महत्येचे प्रकार घडत असतात. (पालकांकडून सुद्धा जात-धर्म-प्रेम-लग्न या कारणांतून मुलांच्या होणाऱ्या हत्या या अशाच विकृतीचे प्रकार असतात.) अशा अवस्थेपर्यंत पोचण्याआधीच स्वतःची अवस्था लक्षात आली आणि आपल्याला प्रेमाकडून पझेशन, मानसिक आजार व मानसिक विकृतीकडे नेणारा टप्पा आपल्या लक्षात आला तर वेळीच यावर उपचार होऊ शकतात व पुढचे गैरप्रकार थांबू शकतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा