शेअरिंग-केअरिंग - 14 - ....लैंगिक संबंध.. - भाग - 11
प्राथमिक टप्प्यावर दोघांमध्ये संवादातून काही उपाय काढणे जेव्हा अवघड जाते तेव्हा बिनदिक्कतपणे तज्ञ डॉक्टरांना भेटून त्यांच्याकडून समुपदेशन, तपासणी व उपचार घेणे गरजेचे आहे. अनेकदा काही गोष्टी या फक्त समुपदेशनातून सुद्धा सुटू शकतात. काही बाबतीत आपल्या मनात असणारे पूर्वग्रह कारणीभूत असतात, कधी चुकीची माहिती, कधी चुकीचे समज, कधी चुकीचे सल्ले, कधी भिती तर कधी अतिकाळजी अशी अनेक मानसिक कारणे यामागे असू शकतात, जी समुपदेशनातून दूर होऊ शकतात.
कधी कधी काही हार्मोन्सच्या कमी-जास्त प्रमाणामुळे लैंगिक इच्छांवर परिणाम होऊ शकतो. यावर काही औषधे घेतल्याने फरक पडू शकतो. कधी काही व्यसन, तंबाखू, दारू, सिगारेट यांच्या अतिसेवनामुळे इच्छा कमी होतात, त्यावरही वैद्यकीय सल्ले व उपचार घेऊनच काही करता येऊ शकते. त्यासाठी लैंगिक तज्ज्ञां (sexologist)ना भेटणे गरजेचे आहे.
वैद्यकीय उपचार घेण्यामध्ये कोणताही कमीपणा किंवा संकोच बाळगण्याचे काहीही कारण नाही. इतर साध्या साध्या आजारांसाठी आपण जसे सहज डॉक्टरांकडे जातो, तसेच इथे सुद्धा जायला हवे. मी डॉक्टरांकडे ही जाणार नाही आणि आपापसांत पण काही बदल करायला तयार नाही, असं जर कुणी म्हणत असेल तर मात्र या समस्येवर उपाय निघणे कठीण आहे. आपल्या लैंगिक समस्यांना समस्याच मानायचे नसेल आणि जोडीदाराने मी जसा/जशी आहे तसेच मान्य करावे अशी अपेक्षा असेल तर मात्र अवघड आहे.
स्वतः कोणत्याही उपायाला तयार न होता, पण वेगळेही न होता याच जोडीदारासोबत पुढे राहायचे असेल तर मग शेवटी फक्त एकच पर्याय उरतो, तो म्हणजे आपल्या जोडीदाराने स्वतःच्या लैंगिक संबंध व समाधानासाठी दुसरा जोडीदार मिळवणे व त्याला आपण मनःपूर्वक संमती देणे. त्यातही पुन्हा दुसऱ्या जोडीदाराला हा पर्याय मान्य असायला हवा. दोघांपैकी एकाला जरी हा पर्याय मान्य नसेल व आधीचे काही उपाय पण करायची तयारी नसेल तर मात्र दोघांनी संगनमताने एकमेकांपासून वेगळे झालेले केव्हाही चांगले. नाहीतर मग आयुष्यभर लैंगिक सुखापासून परावृत्त राहणे किंवा जोडीदाराची जबरदस्ती सहन करणे आणि एकमेकांना दोष देत राहणे याशिवाय दुसरा पर्याय रहात नाही. आज अनेक जोडपी नाईलाजाने अशाच पद्धतीने एकत्र राहत आहेत हे इथले कटू वास्तव आहे.
याचे कारण म्हणजे लैंगिक सुख ही सुद्धा आनंदी जीवनाची गुरुकिल्ली असू शकते हेच आपल्या समाजात अजूनही मान्य नाहीये. दोन जोडीदारांच्या विचार, स्वभाव, आवडी-नावडी व इतर कौशल्यांमधील तफावती जितक्या सहज सांगितल्या व मान्य केल्या जातात, तसे लैंगिक संबंधांच्या बाबतीत मात्र होत नाही. हा दोघांच्या बेडरूम मधला विषय आहे आणि तो तिथेच मिटवला पाहिजे अशा पद्धतीने सगळेच याकडे पाहतात. त्यामुळेच अनेक मुला-मुलींना याबाबतीत कोंडलेपण येत असते. हे बदलण्यासाठी लैंगिक संबंधांकडे बघण्याची दृष्टी सर्वांनीच बदलायला हवी. आज अनेक अयशस्वी लग्नांमध्ये 'लैंगिक संबंध' हाच मुद्दा बहुतांश प्रमाणात दिसून येतो, हे लक्षात घेऊन तरी याविषयी अधिक गांभिर्याने विचार करणे गरजेचे आहे.
- सचिन (8424041159)
(आपल्या प्रतिक्रिया, मत, अनुभव नक्की कळवा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा