पझेसिव्हनेस 13 - प्रेम कशाला म्हणू नये?
मला दुसरं कोणत्या मुलीशी जास्त वेळ हसून-खेळून बोलताना पाहिलं कि ती खूप चिडते. कारण तिचं माझ्यावर खूप प्रेम आहे ना, म्हणून. मी दुसऱ्या कोणत्या मुलाच्या बाईकवर बसलेले दिसले कि तो प्रचंड चिडतो, कारण त्याचे माझ्यावर प्रेम आहे ना म्हणून. 'प्रेम आहे म्हणजे जलसी असणारच ना यार' असं म्हणणारी सुद्धा अनेक मंडळी असतात. ही जलसी असणं म्हणजेच प्रेम असणं असं त्यांना वाटत असतं. पुढे पुढे जेव्हा याच जलसीतून अनेक मित्र-मैत्रिणी तुटायला लागतात तेव्हा याच्या तीव्रतेची जाणीव व्हायला लागते. याच जलसीतून पुढे संशयी वृत्ती सुद्धा वाढायला लागते आणि मग मात्र हे नातं व नात्यातील प्रेम आणि विश्वास टिकवणं अवघड होत जातं. त्यामुळे योग्य वेळीच पझेसिव्हनेस मधून येणाऱ्या या जलसीला आवरता आलं तर पुढचे धोके टळू शकतात.
आपल्याकडे 'जब प्यार हैं तो पझेशन तो मंगता ही हैं ना यार..' असं म्हणणारी काही आशिक मंडळी अनेकदा पझेसिव्हनेसलाच प्रेम समजत असतात. याच पझेसिव्हनेस मधून मग एकमेकांवर चिडणे, रागावणे, हक्क गाजवणे, अनेकदा हात उचलणे हे प्रकार सुद्धा सर्रास घडताना दिसतात. आणि वरून 'प्रेम आहे ना, म्हणून मारतो, चिडतो, रागावतो' असं त्याचं समर्थन सुद्धा ही मंडळी करत असतात. म्हणूनच तर कबीर सिंग सारख्या 'प्रेम कशाला म्हणू नये' हे ज्यातून शिकायला हवं अशा चित्रपटातील हिरो सुद्धा यांना आवडायला लागतात. खरं तर प्रेमाच्या दुनियेतला व्हिलन कसा असू शकतो हे कबीर सिंग दाखवतो. आपली प्रेयसी ही आपल्या मालकी हक्काची वस्तू असल्यासारखे तिला पाहिजे तसे, पाहिजे तेव्हा वागवणे म्हणजे प्रेम असते का? भरलेल्या क्लास मध्ये येऊन सर्वांसमक्ष तिच्यावर आपलाच हक्क असल्याचे सर्वांना सांगणे, आपल्या मर्जीने तिला पाहिजे तेव्हा बाहेर बोलावणे, गाडीवर बसायला सांगणे आणि फिरायला घेऊन जाणे, तिची मैत्रीण सुद्धा स्वतःच ठरवून देणे, तिची वर्गात बसण्याची जागा सुद्धा स्वतःच ठरवून देणे, आपल्याच मर्जीने तिला मुलांच्या होस्टेलवर स्वतःच्या रूममध्ये राहायला लावणे, तिच्याकडे साधं कोणी पाहिलं जरी तरी त्यावरून मारामारी करणे, तिला काय पाहिजे नको हे सगळं स्वतःच ठरवणे, आपण किती वेळा सेक्स केलाय हे गिणती करून सांगणे हे सगळं म्हणजे प्रेम? कि प्रेमाची बदनामी? आणि या सगळ्यात त्या वस्तू मानल्या गेलेल्या मुलीची स्वतःची काही भूमिकाच नाही? तिने स्वतःसुद्धा आपलं सगळं स्वत्व, विचार, मतं, बुद्धी गहाण टाकून वागणं म्हणजे प्रेम?? आणि एवढं असूनसुद्धा आजच्या तरूण पिढीतील अनेकांना आणि त्यात मुलींना सुद्धा 'प्रियकर कसा असावा?' असा प्रश्न विचारल्यावर 'कबीर सिंग सारखा' अशी उत्तरं आली कि 'काय होणार या बिचाऱ्यांचं?' अशा प्रश्नाने या मुला-मुलींबद्दल आम्हाला काळजी वाटायला लागते. म्हणजे ज्या ठिकाणी त्या मुलीला तिच्या बद्दलचे निर्णय घेत असताना एकदाही विचारलं जात नाही कि यात तिचं मत काय आहे? असे उदाहरण सुद्धा जर आजच्या पिढीतील काही तरुणांना प्रेमाचे आदर्श वाटत असेल तर एकीकडे समानतेच्या वाटेवर चालू पाहणाऱ्या, त्याचा आग्रह धरू पाहणाऱ्या या तरुणाईच्या भूमिकांची कीव वाटायला लागते. असले चित्रपट या तरुणाईच्या भूमिकांमध्येच किती गोंधळ निर्माण करतात हे यातून दिसते. प्रचंड पझेशन, ऍग्रेशन असणं म्हणजे प्रेम वाटायला लागलं तर प्रेम ही संकल्पनाच धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच.
- सचिन (8424041159)
( आपले या संदर्भातील अनुभव, मतं, प्रतिक्रिया नक्की शेअर करा.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा