शेअरिंग-केअरिंग- 13 - ती, तो आणि लैंगिक संबंध - भाग 10

 एकमेकांच्या लैंगिक इच्छा व अनिच्छेचा आदर करून एकमेकांच्या सोबतीने एकमेकांना संतुष्ट ठेवण्याचा प्रयत्न जोडीदारांनी करायला हवा असं आपण मागच्या लेखात म्हटलं. पण यात जास्त अडचण तेव्हा येते जेव्हा दोघांच्या लैंगिक इच्छा व अपेक्षा यांच्यामध्ये बराच फरक असतो. म्हणजे एका जोडीदाराला एका दिवसात किंवा रात्रीत दोन-तीन वेळा संबंध हवेच असतात, किमान दिवसातून एकदा तर हवंच हवं असा त्याचा आग्रह असतो आणि दुसऱ्या जोडीदाराला मात्र कधीतरी आठवड्यातून एखाद्या वेळी किंवा कधी कधी दहा पंधरा दिवसांतून एखाद्या वेळी इच्छा होत असते, तेव्हा मात्र ही दरी फार मोठी होते व एकमेकांच्या इच्छा व अनिच्छेचा आदर हळूहळू कमी होत जाऊन त्यातून निराशा, एकमेकांविषयी तक्रारी, चिडचिड या गोष्टी सुरू होतात. इतर कोणत्याही तक्रारींपेक्षा आपल्या लैंगिकतेविषयीची तक्रार फारशी कुणाला सहन होत नाही. मग अर्थातच यातून दोघांमध्ये दुरावलेपण येत जाते. यावर काही उपाय आहेत का? तर अनेक आहेत. त्यापैकी काही उपाय हे अगदी सहजासहजी करण्यासारखे आहेत.

सेक्स म्हणजे फक्त इंटरकोर्स (योनी व लिंग यांचे मिलन) नसून त्याच्या बऱ्याच आधी त्याची सुरुवात होते. आलिंगन, चुंबन, हळुवार स्पर्श यांसारख्या गोष्टींनी आपला प्रणय अधिक रोमांचकारी होत असतो. अनेकदा या गोष्टी आपल्या जोडीदारामध्ये लैंगिक इच्छा जागृत करण्यासाठी पण मदत करत असतात. असे हळुवार रोमांचकारी अनुभव असतील तर लैंगिक संबंध हवाहवासा वाटू शकतो. याच्यापुढे जाऊन हस्तमैथुन, मुखमैथुन, गुदमैथुन यांसारखे प्रकार सुद्धा आहेत. अर्थात पुन्हा यात दोघांची आवड व इच्छा महत्वाची. कुणावरही यातले कोणतेही प्रकार लादण्याचे प्रयत्न चुकूनही करू नये. दोघांची तयारी असेल तरच यातले काही प्रयोग करून पाहता येतील. यातील गुदमैथुन हा प्रकार अनेक स्त्रियांना आवडत नाही, काहींना तर त्याची कल्पनाही सहन होत नाही, त्यामुळे तो प्रकार दूरच. पण हस्तमैथुन व मुखमैथुन हे तसे जवळपास सर्वांना शक्य असणारे प्रकार आहेत. हे दोन्ही शक्य असतील तर उत्तमच; पण दोन्ही शक्य नसतील तर जे शक्य आहे त्याचा उपयोग किमान जेव्हा एका जोडीदाराची इच्छा नाही व दुसऱ्या जोडीदाराची मात्र इच्छा आहे, त्यावेळी आपल्या जोडीदाराच्या इच्छापूर्तीसाठी निश्चित करता येऊ शकतो. यामुळे कुणावरही जबरदस्तीच्या लैंगिक संबंधांचे लादलेपणही येणार नाही आणि लैंगिक असमाधानातून येणारे नैराश्यही येणार नाही. त्यासाठी मुळातच आधी लैंगिक संबंध व लैंगिक अवयवांकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट असायला हवा.
आपल्या संस्कारांनुसार आत्तापर्यंत आपण आपल्या स्वतःच्या सुद्धा लैंगिक अवयवांकडे अजून स्वच्छ नजरेने पाहायला शिकलेले नसतो, तिथे समोरच्याच्या अवयवांबद्दल काय अवस्था असेल? तर त्याचीही सुरुवात स्वतःपासून करायला हवी. स्वतःच्या व इतरांच्या सुद्धा लैंगिक अवयवांना आधी इतर अवयवांइतकंच सहजपणे मान्य करायला शिकायला हवं. त्यांच्या स्वच्छतेकडे सुद्धा आवर्जून लक्ष द्यायला हवं. बऱ्याचदा जोडीदाराची अस्वच्छता ही सुद्धा लैंगिक संबंधाच्या वेळी किळस आणणारी गोष्ट असू शकते. हस्तमैथुन व मुखमैथुन करताना तर स्वच्छतेशिवाय या प्रकारांची कल्पना पण करणे अवघड आहे. लैंगिक आनंद घेताना दोघांच्याही मनात एकमेकांच्या लैंगिक अवयवांविषयी नकारात्मक भावना असतील तर मोकळेपणाने संबंध ठेवता येणे कठिण आहे.
पुढच्या टप्प्यावर लैंगिक संबंध ही फक्त लग्नानंतर मुलांना जन्माला घालण्यासाठी करायची रूटीन गोष्ट नसून ती आनंदासाठी करण्याची गोष्ट आहे हे लक्षात घ्यावे लागेल. एकदा यातला आनंद आणि या कृतीमागचा हेतू स्पष्ट झाला की मग आपसूक याकडे बघण्याची दृष्टी सुद्धा बदलते. मनुष्य प्राणी हा लैंगिक संबंधांच्या बाबतीत इतर प्राण्यांपेक्षा वेगळा आहे. इतर प्राणी हे फक्त पुनरुत्पादन या हेतूनेच लैंगिक संबंध ठेवतात आणि त्यामुळे त्यांची सेक्सची पोझिशन ही नेहमी लिंग-योनी प्रवेश एव्हढ्यापुरतीच मर्यादित असते. मनुष्य मात्र या एकाच हेतूने लैंगिक संबंध ठेवत नसून स्वतःच्या आनंदासाठी, समाधानासाठी व लैंगिक तृप्तीसाठी लैंगिक संबंध ठेवत असतो. म्हणूनच काही लैंगिक संबंधांच्या प्रकार व पोझिशन्स विषयी नैसर्गिक व अनैसर्गिक असे काही विभाजन काहीजण करतात ते फारसे इथे लागू होत नाही. दोघांना आवडणारा, दोघांची इच्छा असणारा, तयारी असणारा, शक्य असणारा व आनंद देणारा असा कोणताही प्रकार किंवा पोझिशन्स करायला काहीच हरकत नाही. उलट यामुळे लैंगिक संबंधांमध्ये विविधता येईल व हे संबंध रोजचे रूटीन वाटणार नाहीत आणि यात अधिक मजा घेता येईल. अर्थात पुन्हा अट एकच- जोडीदारावर कोणत्याही प्रकार किंवा पोझिशन्ससाठी जबरदस्ती नको, अनाठायी आग्रह नको. दोघांची इच्छा, तयारी व आनंद असेल अशाच पोझिशन्स व प्रकार दोघे मिळून निवडा व त्यांचा आनंद घ्या आणि द्या सुद्धा.
प्राथमिक टप्प्यावर दोघांनी संगनमताने आपापसांत मोकळा संवाद ठेवून एकमेकांच्या इच्छा, भावना व आवडी-नावडी लक्षात घेऊन त्यानुसार आपापसांत काही उपाय काढून एकमेकांना लैंगिक सुख मिळवून देण्याचा हा उपाय आहे. यातून प्रश्न सुटले तर उत्तमच, नाही सुटले तर मग पुढच्या टप्प्यावरचे उपाय आहेतच.
- सचिन (8424041159)
(आपली प्रतिक्रिया, मत, अनुभव या नंबर वर व्हाट्सअप्प करू शकता.)

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध