शेअरिंग-केअरिंग - 12 - ती, तो आणि लैंगिक संबंध - भाग 9

 लग्न करताना आधीच आपल्या जोडीदारासोबत त्याची/तिची लैंगिकता व लैंगिक संबंधाविषयीचे विचार, समज आणि अपेक्षा याविषयी बोलायलाच हवे हे आपण आधी बोललोच. तरीही अनेकदा या सिरीजच्या तिसऱ्या लेखात पाहिलेल्या सुरेश आणि गीताच्या उदाहरणांसारखे काही उदाहरणे असू शकतात कि ज्यामध्ये सुरुवातीच्या काळात असणारी लैंगिक इच्छा नंतरच्या काळात कमी होत जाऊ शकते किंवा याच्या उलट काही वेळा काहीजणांमध्ये ती वाढतही जाऊ शकते. या जर-तरच्या पुढे घडणाऱ्या गोष्टी ना आपल्याला आधी माहिती असतात, ना आपण त्याविषयी आधी काही करू शकतो. अशा वेळी एकमेकांना दोष न देता त्यामागची नेमकी कारणे शोधून त्यावरील उपायांचा विचार करायला हवा.

त्या लेखानंतर अनेकांचे प्रतिसाद आले होते. काहींनी काही उपाय सुचवले तर काहींनी एवढं विचारपूर्वक लग्न करूनही असे प्रॉब्लेम येऊ शकतात याविषयी चिंता व्यक्त केली होती. ही चिंता साहजिक आहे, पण याकडे प्रॅक्टिकल दृष्टीने पाहून यावरील उपायांचा शोध घेतला तर ही चिंता मिटू शकते.
अनेकदा सुरुवातीला नवीन नवीन असल्याने लैंगिक संबंधांविषयी वाटणारे आकर्षण नंतरच्या काळात ते सवयीचे झाल्याने आपोआप कमी होत जाऊ शकते, जसे ते इतर अनेक गोष्टींच्या बाबतीत सुद्धा आपण अनुभवत असतो. कधी कधी त्यातील पोझिशन्स किंवा ते करण्याच्या पद्धतीत जर नाविन्य नसेल तर तोचतोचपणाच्या अनुभवातून सुद्धा इच्छा कमी होत जाते. अशा वेळी दोघांचा लैंगिक संबंधांच्या विषयावर मोकळा संवाद असेल तर एकमेकांशी बोलून दोघांना शक्य असेल असे काही नाविन्य यात आणता येऊ शकते. बऱ्याचदा लग्नानंतर काही दिवसांतच नात्यातील रोमँटिकपणा कमी होऊन ते रोजचे रहाटगाडगे वाटायला लागलेले असते किंवा अनेकदा कुटुंबात जर वातावरण तणावाचे असेल तर त्याचाही परिणाम लैंगिक इच्छांवर होऊ शकतो. यासाठीही मध्येमध्ये आऊटिंग, दोघांनीच एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला जाणे, सतत एकमेकांना चार्ज करत राहणे, रोमँटिक गाणी, जोक्स, चित्रपट एकत्र पाहणे आणि एकमेकांना सतत फुलवत ठेवणे गरजेचे असते. अर्थात हे सगळ्यांनाच जमेल असं नसतं आणि त्यामुळेच या छोट्या छोट्या पण नात्यात अतिशय महत्त्वाच्या ठरू शकणाऱ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.
लैंगिक संबंध ही जबरदस्तीने करायची किंवा फक्त लग्न झालंय म्हणून आता करायलाच हवं म्हणून करायची गोष्ट नसून ती दोघांच्याही संगनमताने दोघांनाही आनंद मिळवून देण्यासाठी करायची गोष्ट आहे हे लक्षात घेऊनच याकडे पाहायला हवे. एकदा असा दृष्टिकोन ठेवला कि मग पुढचा टप्पा येतो तो म्हणजे दोघांनाही एकाच वेळी इच्छा असेल अशी शक्यता किती वेळा असू शकते? मग एकाची इच्छा आहे पण दुसऱ्याचा मूड नाही किंवा आता स्वतःची इच्छा नाही पण जोडीदाराची आहे म्हणून मग मन नसताना तयार होणे अशा गोष्टी जर वारंवार घडू लागल्या तर यातून सुद्धा दोघांच्याही मनात सेक्स विषयी नकारात्मक भावना येऊ लागतात, ज्याचा परिणाम पुढे एखाद्याची लैंगिक इच्छाच कमी होण्यात होऊ शकतो. हा जरा अवघड आणि नाजूक मुद्दा असतो. यावर सुद्धा दोघांत मोकळा संवाद असेल तर मार्ग काढणे सोपे होऊ शकते. पुन्हा यात जर प्रत्येक वेळी एकाच जोडीदाराची इच्छा नसते व दुसऱ्याची असते; पण तिची/त्याची इच्छा राखण्यासाठी जर वारंवार एकाच जोडीदाराची इच्छा दाबली जात असेल तर यातून त्या जोडीदारामध्ये त्याच्या स्वभावानुसार कधी अपराधीपणा, कोंडलेपण, नैराश्य तर कधी आक्रमकपणा, त्यातून दुसऱ्या जोडीदारावर लादलेपण येऊ शकते व या सगळ्याचा परिणाम दोघांच्या एकूणच वैवाहिक आयुष्यावर होऊ शकतो. असे होऊ नये म्हणून वेळोवेळी एकमेकांच्या भावना समजून घेणे, जोडीदाराच्या लैंगिक इच्छांकडे दुर्लक्ष न करणे, एकमेकांच्या लैंगिक इच्छांचा व अनिच्छेचा सुद्धा आदर करणे व त्याविषयी सतत मोकळेपणे बोलत राहणे आणि एकमेकांना संतुष्ट करण्यासाठी एकमेकांच्या सोबतीने सतत प्रयत्न करत राहणे गरजेचे असते.
- सचिन (8424041159)
(आपले प्रतिसाद, मतं, अनुभव, विचार, प्रश्न या नंबर वर नक्की पाठवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध