पझेसिव्हनेस 11 - जब हम प्यार करने लगे..👐

मैत्रीच्या पुढच्या टप्प्यावर जेव्हा दोन व्यक्ती एकमेकांच्या अधिक जवळ येतात, तेव्हा तर ही पझेसिव्हनेसची पातळी पण अधिक वरच्या टप्प्यावर असते. मैत्रीच्या पलीकडची आणि प्रेमाच्या अलीकडची अशा स्थितीत बऱ्याचदा या पझेसिव्हनेसची वाढ व्हायला सुरुवात होते. त्या स्थितीत जेव्हा दोघांनाही एकमेकांची जवळीक हवीहवीशी वाटत असते तेव्हा साहजिकच ही पझेसिव्हनेसची भावना सुद्धा दोघांसाठीही खूप सुखावणारी असते. आपल्याला हवीहवीशी वाटणारी व्यक्ती आपल्या बाबतीत पझेसिव्ह आहे, ही भावना सुद्धा त्यावेळी रोमँटिक वाटत असते.

👐
दोघेही भावनेच्या एकाच स्टेजला असतील तर हा पझेसिव्हनेस खरं तर काही काळ तरी नात्यात मजाच आणतो. ती मजा घ्यायला काहीच हरकत नाही. फक्त जशी याची पातळी वाढत जाते, तसे हे पझेशन समोरच्यावर लादले जायला लागते. सुरुवातीच्या दिवसांत दुसऱ्या कोणत्या मुलाशी/मुलीशी बोलल्यावर तो/ती चिडतात हे आपल्याला आवडते; कारण त्यातून त्यांचे आपल्यावर प्रेम आहे हे आपल्याला कळत असते आणि ती भावना आपल्याला जवळची व हवी अशी वाटत असते. पण हेच जेव्हा पुढे सतत व्हायला लागते तेव्हा मात्र त्याचे ओझे वाटायला लागते. आपल्याला आपले मित्र-मैत्रिणी आपल्या मनाने निवडण्याचे व त्यांच्याशी कसे वागायचे हे ठरवण्याचे स्वातंत्र्य ही जायला लागते. समोरच्यासाठी ती आपल्याबद्दलची काळजी असते, पण आपल्यासाठी मात्र ते बंधन ठरायला लागते. याच पझेसिव्हनेसच्या भावनेतून पुढे आपले वागणे, बोलणे, वावरणे या सगळ्यावर बंधने यायला लागतात. आपले पेहराव, आपले दिसणे दुसरं कोणीतरी ठरवायला लागतं. आपल्या मोकळ्या वेळेचं नियोजन सुद्धा आपल्या हातात राहात नाही. अनेकदा मित्र-मैत्रिणी, नातेवाईक, भाऊ-बहिणी यांच्यापासून सुद्धा आपण वेगळे पडायला लागतो. आपले प्राधान्यक्रम आपल्याला ठरवता येत नसतील, आपली आवड आपल्याला जोपासता येत नसेल, आपले निर्णय आपल्या हातात राहिले नसतील, आपल्या आयुष्यातील व्यक्ती विशेषतः मित्र-मैत्रिणी ठरवण्याचे व त्यांच्यासोबत वेळ किती व कसा घालवायचा याचे स्वातंत्र्य आपल्याला नसेल आणि या सगळ्या गोष्टी आपला प्रियकर किंवा प्रेयसी ठरवत असेल किंवा कंट्रोल करत असतील तर आपल्या प्रेमात पझेसिव्हनेसचा व्हायरस शिरून तो आता मोठ्या प्रमाणात पसरला आहे हे लक्षात घ्यायला हवे आणि तातडीने यावर उपचार नाही झाले तर हा व्हायरस आपलं नातं किंवा नात्यातील प्रेमभावना संपवून टाकणार हे निश्चित असते.
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध