काल 'भूमिका' हा मराठी चित्रपट पाहताना अनेक विचार मनात येऊन गेले. आपण प्रत्येकजण एका जन्मात कितीतरी भूमिका निभावत असतो. एकाच वेळी नात्यांमध्ये आई, वडील, भाऊ, बहिण, नवरा, बायको, मुलगा, मुलगी, काका, काकी, मामा, मामी, मावशी, आत्या, आजी, आजोबा यांपैकी अनेक नाती तर त्याचवेळी मैत्रीच्या जगात मित्र, मैत्रिण, जिवलग, प्रियकर, प्रेयसी अशी नाती आणि याच वेळी कामाच्या ठिकाणी सहकारी म्हणून, ज्युनिअर, सिनियर म्हणून, कुणी बॉस म्हणून तर कुणी नोकर म्हणून, कुणी शिक्षक, कुणी डॉक्टर, कुणी पोलीस, कुणी शेतकरी तर कुणी स्वतःचा व्यवसाय अशा आपापल्या कामाच्या क्षेत्रांत तर त्याच वेळी समाजात एक नागरिक म्हणून सुद्धा वेगवेगळ्या भूमिका बजावत असतो. या प्रत्येक भूमिकेत आपल्याकडून अनेकांना अनेक अपेक्षा असतात, तशाच आपल्यालाही अनेकांकडून अनेक अपेक्षा असतात. यातल्या काही अपेक्षा प्रत्यक्ष असतात, तर काही अप्रत्यक्ष. या अपेक्षा पूर्ण करण्याचे ओझे घेऊनच आपण या सगळ्या भूमिका जगत असतो. अर्थात यातसुद्धा ज्याच्या क्षमता कमी त्याच्याकडून अपेक्षा सुद्धा कमी आणि ज्याच्या क्षमता जास्त, त्याच्याकडून अपेक्षा जास्त हे सूत्र तर सगळीकडेच लावलेलं असतं. पण यातल्या सगळ्याच भूमिकांना किंवा त्यातील अपेक्षांना पूर्ण न्याय देणे कुणालाच शक्य नसते. कितीही प्रयत्न केला तरी अनेक भूमिकांच्या सर्वच अपेक्षांना आपण पुरे पडत नाही. या अपुरे पडण्याच्या जाणिवेने अनेकजण चिंतित असतात.
हीच चिंता अति प्रमाणात झाली कि त्याची परिणती नैराश्यात होते. आपण प्रत्येकजण आयुष्यात कधी ना कधी या नैराश्याच्या टप्प्यातून जातच असतो. हा टप्पा कधी अगदी थोड्या वेळापुरता असतो तर कधी तो दीर्घकाळ टिकून राहतो. हे नैराश्य कोणत्या भूमिकेबाबत आहे, यातील अपेक्षांमध्ये आपण नेमके कुठे आहोत, यात आपल्या सोबत कोण आहेत आणि आपली विचार करण्याची शैली कशी आहे, आपला एकूण स्वभाव कसा आहे यावरून या टप्प्याची लांबी ठरत असते.
नैराश्याचा टप्पा जेवढा अधिक तेवढा जास्त नुकसानकारक असतो. एखादी कार्यक्षम व क्षमता असणारी पण मनाने हळवी असणारी व्यक्ती जर एकाच वेळी अनेक भूमिकांच्या अपेक्षेत कमी पडायला लागली किंवा तसे तिला वाटायला लागले तर मात्र ती तीव्र नैराश्याच्या गर्तेत सापडू शकते. अशा टप्प्यावर आत्महत्या हाच या सर्व समस्यांवर एकमेव उपाय वाटायला लागतो. सतत आत्महत्येचे विचार मनात यायला लागतात. योग्य वेळीच जर काही समुपदेशन किंवा उपचार होऊ शकले नाहीत तर अशी व्यक्ती खरोखरच जीव गमावून बसण्याची शक्यता असते.
याचसाठी अनेक भूमिकांच्या अपेक्षांच्या ओझ्याखाली स्वतःला गाडून न घेता वास्तविक विचार करून जिथे शक्य नाही तिथे स्पष्ट नाही म्हणायला शिकायला हवं व हे आधी आपल्या मनाला सुद्धा पटवून द्यायला हवं. शिवाय आपल्या मनात असणाऱ्या असंख्य विचारांच्या गुंत्यात अडकून जेव्हा आपल्याला एकाकीपणा किंवा नैराश्याच्या टप्प्यातून जात असल्याची जाणीव होईल त्याच वेळी आपण सावधपणे आपल्या मनाची दारे मोकळी करून इतरांशी गोष्टी शेअर करायला हव्यात.
यात अनेकदा अडचण अशी असते कि आपण ज्याच्याशी शेअर करू ती व्यक्ती तेवढी विश्वासार्ह असणे गरजेचे असते. अनेकदा आपल्याला समोरच्याकडून काहीही सल्ला किंवा उपदेश नको असतो, फक्त आपल्या मनातील गोष्टी शेअर करून आपलं मन मोकळं करायचं असतं. पण तशी योग्य व्यक्ती न मिळाल्याने हा ताण आतल्या आतच अधिक वाढत जातो. त्याकरता प्रत्येकाजवळ आपली अशी काही हक्काची माणसं असायलाच हवीत. पण एखाद्याजवळ ती नाहीत म्हणून पुन्हा निराश न होता इतर पर्याय शोधायला हवेत. एकूण काय तर असंख्य गोष्टी, विचार व जबाबदऱ्यांचे ओझे वाहणाऱ्या आपल्या मेंदूला कुठेतरी आउटलेट मिळायला हवं जिथे हे ताण हलके करता येतील.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा