पझेसिव्हनेस 10

मी कॉलेज मध्ये असताना माझ्या मित्राला कधी त्याची फारशी स्पेस घेऊच दिली नाही याची आता जाणीव झाल्याचे आमचा रूपेश परवा मला सांगत होता. त्याला नेहमी असं वाटायचं कि त्याच्या मित्राने त्याच्या सोबतच नेहमी राहायला हवे आणि या गोष्टीवरून त्याने मित्राबरोबर भांडण सुद्धा केले होते. त्याचवेळी आमची निलम सांगते कि तिची कॉलेजची एक जिवलग मैत्रीण कॉलेज सोडून दुसऱ्या कॉलेजमध्ये गेली याचे कारण होते ते फक्त निलमने दुसऱ्या मुलीशी मैत्री केली हे. तिच्या शिवाय निलमची दुसरी कुणीच मैत्रीण असू नये असं तिला वाटत होतं. असेच काहीसे किस्से आमच्याही मित्र-मैत्रिणींमध्ये होते असे निशा, प्रतिक्षा, मृणाल व इतरांचे पण म्हणणे आहे. आपले मित्र-मैत्रिणी आपल्यासाठी अगदीच खास असतात, तर मग त्यांच्यासाठी पण आपण असेच खासच असायला हवे असा आग्रह अनेकांचा दिसतो. त्यामुळे आपल्या अशा खास मित्र-मैत्रिणींच्या आयुष्यातील सर्व खास गोष्टी आपल्यालाच आधी माहिती असायला पाहिजेत किंवा आपल्याला तर त्या माहिती असायलाच हव्यात आणि किमान इतरांना माहिती होण्याआधी तरी त्या आपल्यालाच माहिती असायला हव्यात असाही हट्ट अनेकांचा असतो. आणि मग तसं नाही झालं कि त्यातून नाराजी, रूसवे-फुगवे, वाद, भांडणं, गैरसमज असलं बरंच काय काय होत राहतं. हे सगळं समोरच्याबद्दल आपल्या मनात असणाऱ्या प्रेमभावातून आलेल्या अति पझेसिव्हनेस मधून होत असतं. अशा हट्टापायी अनेकदा चांगल्या मित्र-मैत्रिणींना आपल्या आतुष्यातून गमावण्याची सुद्धा वेळ अनेकांवर येते. त्याचवेळी काही मैत्रीची नाती मात्र याला अपवाद ठरत असतात. आमच्या छायाताई सांगत होत्या कि असे पझेसिव्ह असणारे काही मित्र-मैत्रिणी त्यांच्याही आयुष्यात आले; पण अर्थातच ते त्यांच्या पझेसिव्हनेस मुळे फार काळ टिकू शकले नाहीत. आणि या सगळ्यातून जे मित्र-मैत्रिणी टिकले ते एकमेकांबाबत पझेसिव्ह न होता मैत्री निभावणारेच टिकले. आजही ते एरव्ही कित्येक दिवस एकमेकांच्या संपर्कात नसतात, पण जेव्हा त्यांच्यातील एखाद्याला गरज आहे असं कळतं तेव्हा कसलाही मागचा-पुढचा विचार न करता धावून येतात. ही मैत्री त्यांना आयुष्यात जास्त महत्वाची वाटते. नाहीतर मला तू एवढ्या दिवसात फोन का नाही केला म्हणून भांडणारी अनेक उदाहरणे आपण आजूबाजूला बघत असतो. खूप दिवसानंतर फोन केला तर पहिलं एवढे दिवस फोन का नाही केला म्हणून ऐकवणारेच जास्त जण भेटतात. तसेच काही दिवस संपर्क कमी झाला तर तक्रारी करणारेही काहीजण असतात. खरंतर कोणी कितीही एकमेकांचे घनिष्ठ मित्र-मैत्रिणी असले तरी प्रत्येकाचे एक स्वतंत्र आयुष्य असते आणि त्यानुसार प्रत्येकाची परिस्थिती, तिथली माणसं आणि त्यामुळे मित्र-मैत्रिणींची संख्या व प्रमाणही वेगवेगळे असू शकते. शिवाय प्रत्येकाचा स्वभावही वेगवेगळा असतो. हे लक्षात घेऊन आपल्याच हट्टासाठी आग्रही राहणं सोडलं तर नक्कीच मैत्रीचे नाते अधिक छान फुलू शकते. माझी सोलापूरची मैत्रीण आरती व माझ्या मैत्रीचे याबाबत मी नेहमीच उदाहरण देत असतो. एकेकाळी सतत पूर्णवेळ एकमेकांच्या सोबत राहणारे आम्ही गेल्या काही वर्षांपासून कितीतरी महिन्यांनी कधीतरी एकमेकांशी फोनवर बोलणं होतं. पण कितीही दिवसांनी जरी आम्ही एकमेकांशी बोललो तरी आमच्या बोलण्यातला ओलावा नेहमी तोच असतो. तिच्या आयुष्यातील सगळ्या गोष्टी तिने मला सांगितल्याच पाहिजेत असा माझा कधी हट्ट नसतो ना कधी तसा तिचा हट्ट असतो. बाहेरून कुठून जरी आम्हाला एकमेकांबद्दलच्या काही महत्वाच्या गोष्टी कळल्या तरी आम्हाला काहीच तक्रार नसते. आम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा आम्ही एकमेकांना फोन करून मनसोक्त बोलतो. त्यात काहीही एकमेकांबद्दल तक्रारी न करता मनमोकळ्या गप्पा असतात.

अशी मैत्री आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असावी. जिथे हक्काने खूप काही बोलता येईल, समोरच्या माणसाचा आपल्यावर पूर्ण विश्वास असेल आणि आपल्याला त्यांच्याकडे बिनधास्त मन मोकळं करता येईल.
पझेसिव्हनेस मात्र नात्यातील मोकळेपणा कमी करून बांधलेपण जास्त आणतो, त्यामुळे तो गेल्याशिवाय अशी निखळ मैत्री अनुभवता येणं अवघड आहे.
- सचिन (8424041159)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध