घरकाम - 10

                                                                 घरकाम - 10

'घरकाम हे घरात राहणाऱ्या सर्वांचंच काम आहे' असं आम्ही नेहमीच कार्यक्रमांतून सांगत असतो. जसं सुरुवातीच्या लेखांमध्ये लिहिलं होतं कि घरात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने घरकाम हे आपलं काम आहे असं समजून केलं पाहिजे. म्हणजे आता अनेकजण घरकामाला सुरुवात करायला लागले आहेत ते 'मदत' म्हणून किंवा 'त्यावेळची गरज' म्हणून. काल रूपेश बोलला कि 'त्याने घरकाम हे घरात आईला मदत करायला गरज होती म्हणून सुरुवात केली होती आणि त्यात मदत हीच भावना होती; पण आता तो त्या कामाकडे स्वतःचे काम म्हणून बघायला लागला आहे'. हे खूप महत्त्वाचं आहे. सध्या मदत करायला सुरुवात केलीय हे छानच व कौतुकास्पदच आहे, पण या मदतीकडून स्वतःची जबाबदारी म्हणून करण्याकडे वाटचाल व्हायला हवी. शिवाय हे फक्त पुरुषांसाठीच नाही, तर घरातील प्रत्येक स्त्री-पुरुष व मुलांसाठी सुद्धा आहे. काल अर्चना ताई सांगत होत्या कि त्यांचा सात वर्षाचा मुलगा आता त्यांच्याबरोबर फरशी पुसायला मदत करायला लागलाय याचं त्यांना खूप कौतुक वाटतंय. खरंतर या वयापासून ही जाणीव तयार करायला हवी कि 'आपण सगळे घरात राहतो कि नाही, तर मग घरातील काम सुद्धा आपण सर्वांनी मिळून करायला हवं'. कारण याच जाणिवा घेऊन ही मुलं मोठी होणार असतात. अगदी लहान मुलांपासून तर घरात असणाऱ्या कितीही वृद्ध व्यक्तीपर्यंत प्रत्येकाला जर ही जाणीव असेल कि माझ्या घरातील घरकामात माझा काहीतरी वाटा असायलाच हवा, तर आपापल्या क्षमतेनुसार करता येऊ शकणारे काम निवडता येते व करता येते. याबाबतीत गांधीजी नेहमी असं म्हणायचे कि जर मी दिवसभरात काहीच काम केलं नाही, तर मला त्या दिवशी जेवण करण्याचा सुद्धा काहीच अधिकार नाही. आणि त्यांनी अगदी मरेपर्यंत हा नियम पाळला. माझी आजी वयाची ऐंशी पार केल्यानंतर सुद्धा घरातील कामात नेहमी अग्रेसर असायची. त्यामुळे ती कुणाकडेही गेली कि तिथल्या घरातील स्त्रियांना तिचा खूप आधार वाटायचा. एकदा का घरातील प्रत्येकाने घरातील काम ही स्वतःची जबाबदारी मानली कि मग त्या कामांवरून इतरांबद्दलच्या तक्रारी आपसूकच कमी होतात. कारण - आपण इतर कुणाकडे बोट दाखवण्याआधी स्वतः ते काम करण्याचा प्रयत्न केला का? हा प्रश्न आपल्या मनात पहिला येतो. मागे एका लेखात मी म्हटलं होतं कि ज्याच्याकडे रिकामा वेळ जास्त आहे, त्याला घरातील जळमटे जास्त दिसतात. ज्याच्याकडे आधीच भरपूर कामं असतात, त्याला घराचे कोपरे तपासत बसायला वेळच नसतो. हे एक प्रतिकात्मक उदाहरण होते. पण जे खरंच मनापासून काम करणारे आहेत, ते इतरांच्या कामात दोष दाखवत बसण्यापेक्षा किंवा कुणाची तरी वाट पाहण्यापेक्षा स्वतःच उठून झाडूने ती जळमटे काढून टाकतात. त्यामुळे प्रत्येकाने जर घरातील अगदी बारीकसारीक कामापासून 'हे काम माझंच आहे' असा विचार करून ते करायला सुरुवात केली (आत्तापर्यंत असा विचार फक्त घरातील काही स्त्रियाच करत आल्यात), तर इतरांबद्दलच्या तक्रारी कमी होतील. हे फक्त पुरुषांसाठीच लागू होतं असं नाही, तर घरातील सर्वांसाठी लागू होतं. म्हणजे अनेक घरात मुलांसोबतच मुलीसुद्धा काहीच कामं करत नाहीत आणि घरातील काही महिला ज्यांना पुरुषप्रधान संस्कृतीतील नात्याने काही विशिष्ट अधिकार प्राप्त झालेले असतात जसे नणंद, सासू त्यासुद्धा काही काम न करता ज्या करतायत त्यांच्या चुका शोधण्याचं काम करत असतात. यात पुरुषप्रधान व्यवस्था खूप छान काम करत असते. म्हणजे लग्नानंतर सासू दोघांनाही मिळते, पण सासूपणाच्या विशेष सवलती व अधिकार या फक्त मुलीच्या सासूलाच मिळतात. मुलाचं लग्न झाल्यावर मुलाच्या आईला जसं हक्काची घरकामातून सुट्टी मिळाल्यासारखे वाटत असते, तशी संधी मुलीच्या आईला कधीच नसते. तिला आयुष्यभर काम करतच राहावे लागते. (अर्थात हे असंच वडिलांच्या काम करण्याबाबत पण आहेच म्हणा. म्हणजे जसं मुलाचे वडील मुलगा कामाला लागला की लगेच 'आता मी घरी बसायला मोकळा' असं म्हणू शकतात, तसं म्हणण्याची संधी मुलीच्या वडिलांना कधी नसतेच. पण तो आपल्या आजच्या लिखाणाचा मुद्दा नाही. त्याबद्दल पुढे कधीतरी सविस्तर बोलू.) कित्येक महिला तर वाटच बघत असतात कि कधी एकदाचं मुलाचं लग्न होतंय आणि सून घरात येतेय आणि मला कामातून सुट्टी मिळतेय. म्हणूनच तर अनेकदा मुलासाठी मुलगी शोधताना नक्की त्याच्यासाठी बायको शोधतायत कि यांच्या घरकामासाठी आणि सेवेसाठी माणूस शोधतायत हेच कळत नाही. आणि याचाच पुढचा टप्पा म्हणून अनेक घरांमध्ये मुलांच्या आई-वडिलांना अकाली म्हातारपण आलेले दिसते आणि उलटपक्षी मुलीचे आई-वडील मात्र (ज्यांना दुसरा मुलगा नाही आणि त्यामुळे सून येण्याची किंवा घराची आर्थिक जबाबदारी दुसरं कोणीतरी घेण्याची शक्यता कमी आहे) अगदी शेवटपर्यंत काही ना काही कामं करताना दिसतात. याला जोडून पुढे आर्थिक, शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक असे अनेक मुद्दे येतात पण पुन्हा तो वेगळा विषय होईल. असो. तर मुद्दा हा आहे कि आपल्याकडील सामाजिक मानसिकता अशी झालेली आहे कि घरकाम हे एकतर स्त्रियांचे आणि त्यातून सुनांचेच काम जास्त आहे आणि त्यामुळे लग्न होऊन सासरी आलेल्या मुलींकडून लगेच सासरच्या लोकांच्या अपेक्षांची सुरुवात होते. मग तिने स्वयंपाक सर्वांच्या आवडीचाच बनवायला हवा, इतर घरकाम कसं व्यवस्थित च करायला हवं, घर कसं नीटनेटकं ठेवायला हवं इथपासून तर सर्वांशी कसं बोलून चालून राहायला हवं, सर्वांची काळजी कशी घ्यायला हवी? अशा एक ना अनेक अपेक्षांची फैरी सुरू होते आणि हे सगळं करून मग तिने करावी कि तिची नोकरी पण. 'आम्ही नाही कुठं म्हणतोय. आमच्याकडे स्त्रियांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, त्यांना पाहिजे तर नोकरी पण त्या करू शकतात.' इतकं स्वातंत्र्यप्रेमी असणारी ही लोकं बोलत असतात. यातील गोम आपण लक्षात घ्यायला हवी. आणि पुन्हा एकदा दोष फक्त त्यांचा नसून या व्यवस्थेचा आहे हे लक्षात घेऊन आपण तो जाणीवपूर्वक बदलण्यासाठी आपल्या स्वतःपासून, आपल्या घरापासून सुरुवात करणे गरजेचे आहे हे लक्षात घेतले पाहिजे. दुसऱ्याच्या कामात चूक काढताना आपण दिवसात किती कामं केली आणि समोरच्याने किती केली याचा साधा विचार जरी केला तर आधीच जास्त कामं करणाऱ्याकडून अधिक कामाची अपेक्षा न करता आपण आपली कामं वाढवू शकू. काही घरांमध्ये स्वयंपाक करताना भाजीत तिखट-मीठ थोडंही जास्त झालेलं चालत नाही आणि त्याचवेळी जेवताना भाजीत वरून मीठ घेणं ही चालत नाही. तसंच स्वयंपाक अजिबात जास्तही झाला नाही पाहिजे, म्हणजे सगळे जेवल्यानंतर काहीच शिल्लक उरता कामा नये आणि त्याचवेळी कुणाला जेवताना अजिबात काही कमी पण पडले नाही पाहिजे इतकं सगळं मापात झालं पाहिजे अशी अपेक्षा असते. त्यांना एक आठवडाभर स्वतः सगळा स्वयंपाक करून दाखवायला सांगितलं तर त्यांचा हा मानसिक आजार दूर व्हायला नक्कीच मदत होईल.
एकूणच घरकाम हा छोटा किंवा क्षुल्लक मुद्दा नसून हा प्रत्येकाच्या आयुष्यातील, प्रत्येक घरातील न चुकता रोज अनुभवावा लागणारा असा आपल्या आयुष्याचा अतूट भाग आहे हे एव्हाना सर्वांच्या लक्षात आलंच असेल. शिवाय हे जर घरातील सर्वांनी मिळून करण्याचं काम आहे असं एकदा लक्षात घेऊन सर्वांनी त्यानुसार वागायला सुरूवात केली तर प्रत्येकाच्या घरात आनंद, संवाद, समाधान व सुख आणणारा घटक हा घरकाम असू शकतो हे नक्कीच.
सचिन (8424041159)
('घरकाम' या विषयावरील हा सध्या तरी शेवटचा लेख आहे. कारण इतर अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर थोडी तरी मांडणी करणं गरजेचं आहे आणि उपलब्ध असणाऱ्या वेळेत ते करायचं असेल तर आत्ता या विषयाला तात्पुरता ब्रेक देण्याची गरज आहे. पुढे गरजेनुसार व उपलब्ध वेळेनुसार आणखी काही लिहायला जमलं तर नक्कीच प्रयत्न करीन.
तुमच्या प्रतिक्रिया, मत व अनुभव वरील नंबर वर व्हाट्सअप्प मेसज द्वारे किंवा फेसबुकवर कमेंट करून नक्की कळवा.)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पर्व 4 - 'सेक्स' वर बोलू काही (भाग 3 - मुक्त लैंगिकता म्हणजे काय?)

शेअरिंग केअरिंग - भाग 39 (पालकत्व - 1)

लैंगिक संबंध