एका (वेगळ्या) लग्नाची गोष्ट! - मुक्ता दाभोलकर
एका (वेगळ्या) लग्नाची गोष्ट!
- मुक्ता दाभोलकर
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्षे 'जोडीदाराची विवेकी निवड' या उपक्रमाच्या अंतर्गत पारंपरिक विवाहपद्धतीला पर्याय सुचवते आहे. महात्मा फुल्यांनी १५0 वर्षांपूर्वी सांगितलेल्या सत्यशोधकी विवाह पद्धतीमध्ये काही कालसुसंगत बदल करून हा विवाहसोहळा साजरा होतो. नुकताच 'अंनिस'चा कार्यकर्ता सचिन आणि निशा यांनी असा विवाहसोहळा साजरा केला..'बिग, फॅट इंडियन वेडिंग' च्या फिनोमिननशी आपण सारेचजण अतिपरिचित आहोत. मोठे-मोठे राजकारणी, उद्योगपती असोत किंवा तालुक्याच्या गावातील मातब्बर व्यक्ती, प्रत्येकजण आपापल्या ऐपतीप्रमाणे बॉलीवुडची छाप असलेले, तीन-चार दिवस चालणारे लग्न करायची मनीषा बाळगून असतो. हे सर्व बघणारा सामान्य माणूस कधी मोठेपणा मिरवण्याच्या मोहापायी तर कधी लोक काय म्हणतील, या मानसिक दडपणामुळे अशा लग्न सोहळ्यांना शरण जात असतो. मुलीच्या लग्नाचा खर्च आणि हुंडा हे शेतकरी आत्महत्यांमागील एक महत्त्वाचे कारण असते. लग्नाच्या सोहळ्यातील प्रत्येक बारकाव्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देणारा आपला समाज हा त्या सोहळ्यातून सहजीवनाचा, स्त्री-पुरुष समतेचा कोणता विचार ध्वनित होतो याकडे मात्र पूर्ण दुर्लक्ष करतो. ज्यांना हे सगळे नकोसे वाटते असे लोक नोंदणी पद्धतीने, साधे लग्न करून मोकळे होतात. परंतु अनेकांना हा पर्याय रुक्ष वाटतो. पारंपरिक मानसिकतेचे नातेवाईक, मित्र यांना अशा लग्नात काही भूमिकाच राहत नाही आणि त्यांना अशा जोडप्यापासून तुटल्यासारखे वाटते. यातून मार्ग कसा काढायचा? महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेली अनेक वर्षे 'जोडीदाराची विवेकी निवड' या उपक्रमाच्या अंतर्गत याला पर्याय सुचवते आहे. महात्मा फुल्यांनी १५0 वर्षांपूर्वी सांगितलेल्या सत्यशोधकी विवाह पद्धतीमध्ये काही कालसुसंगत बदल करून हा विवाहसोहळा साजरा होतो. नुकताच 'अंनिस'चा कार्यकर्ता सचिन आणि निशा यांनी असा विवाहसोहळा साजरा केला, त्याची ही गोष्ट. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या उपक्रमाच्या माध्यमातून नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील नारायण गव्हाणचा सचिन थिटे आणि सातार्याच्या खटाव तालुक्यातील वाकेश्वर(वडूज) ची निशा फडतरे यांची ओळख झाली. परिचयातून लग्न करण्याचा निर्णय त्या दोघांनी घेतला तेव्हा कालविसंगत, बाईला उणेपणा आणणार्या, जातिभेदावर आधारित असलेल्या लग्नातील रूढी-परंपरांचे पालन न करण्याबद्दल दोघेही ठाम होते. तसेच घरातल्यांना न दुखवता, तुटेपयर्ंत न ताणता हे घडवून आणायचे आहे ही भावना देखील मनात पक्की होती. सचिन 'अंनिस' चा कार्यकर्ता, तर निशाने एम. एस. डब्ल्यू. केलेले. त्यामुळे मुले लग्नाविषयी काहीतरी वेगळा विचार करत आहेत याची आईवडिलांना साधारण कल्पना होती. सचिनच्या शब्दात सांगायचं तर, 'वेगळ्या प्रकारे लग्न करणार हे घरच्यांना माहित होतं, पण म्हणजे नक्की कसं ते स्पष्ट नव्हतं'. लग्न ठरल्यानंतर दोन्ही कुटुंबे एकत्र भेटली तेव्हा या लग्नात काय काय नसेल व त्यामागचे कारण काय, ते सचिन व निशाने आई-वडिलांना सांगितले. ब्राह्मण पुरोहित, होम-हवन, पूजा-अर्चा, कन्यादान, वर ओवाळणी, सूनमुख पाहणे हे प्रकार नसतील, स्त्री-पुरुष समानता राखली जाईल असेच लग्न होईल हे आई-वडिलांनी मान्य केले. 'काय नको' ते सांगून झाल्यावर, लग्नात काय असेल ते ठरवायला सचिन व निशाने एक महिना मागून घेतला. निशा संगमनेरच्या लोकपंचायत या संस्थेत काम करत होती. तेथील प्रा. तुळशीदास जाधव हे सत्यशोधक विवाह व शिव विवाह लावतात. या दोन्ही विवाह पद्धतींची माहिती देणारे साहित्य त्यांनी सचिन व निशाला दिले. या पद्धतीतील मुलीने व मुलाने घ्यायची शपथ, मंत्र, मंगलाष्टके यातील प्रत्येक शब्द बारकाईने वाचून सचिन- निशा यांनी त्यात काही बदल सुचविले. जसं की सत्यशोधकी विवाहातील मुलाने घ्यायच्या शपथेत असं म्हटलं आहे की मी व्यसन करणार नाही परंतु मुलीने घ्यायच्या शपथेत या वाक्याचा उल्लेख नाही. याच विवाह पद्धतीतील मुलीने घ्यायच्या शपथेत असे म्हटले आहे की मी पतीशी एकनिष्ठ राहीन, परंतु पतीने घ्यावयाच्या शपथेत याचा उल्लेख नाही. लग्न करणार्या मुलाने व मुलीने, दोघांनी देखील निर्व्यसनी व एकनिष्ठ असले पाहिजे असे सचिन निशाला वाटत होते. त्यामुळे या दोन्हीही शपथा दोघांनीही घ्याव्यात असे त्यांनी ठरविले. मंगलाष्टकांमधील 'गंगा, यमुना, सरस्वती यांना साक्षी ठेऊन लग्न करतोय' या ओळींमध्ये आक्षेपार्ह काही नव्हते. त्यामुळे त्या तशाच ठेवल्या परंतु 'लाभो संतती बहु तुम्हा' ही ओळ बदलून 'लाभो संतती गुणी तुम्हा' अशी केली. मंगलाष्टकांचा शेवट करताना सत्यशोधकी विवाहात 'सद्मंगल सावधान' असे म्हटले जाते. निशा-सचिन यांना त्यात 'सावधान' हा लग्नाची भीती दाखवणारा शब्द नको होता. कारण त्यांनी विवेकी विचारातून एकमेकांना जोडीदार म्हणून स्वीकारले होते; परंतु विचारपूर्वक घेतलेल्या निर्णयांतील विचारांचे भान कायम राहणे आवश्यक म्हणून त्यांनी 'सद्मंगल सत्यभान' असे शब्द निवडले. बारा वाजता लग्न केलं की लग्नाचे '१२ वाजतात' अशी अंधश्रद्धा आहे. ती दूर करण्यासाठी दुपारी १२ वाजताची वेळ त्यांनी लग्नासाठी निवडली. डी. जे. ला पर्याय म्हणून अकरा ते पावणेबारा या वेळेत परिवर्तनाच्या गाण्यांचा जलसा झाला. मुलगा मुलगी लग्नासाठी स्टेजवर येत असताना 'समतेच्या वाटेनं, खणकावीत पैंजण तू यावं; तू यावं, तू यावं, बंधन तोडीत यावं' हे चळवळीतील गाणं गायलं गेलं. मुला-मुलीसोबत नातेवाईक देखील स्टेजवर आले. दोघांच्या आई वडिलांनी, मामा- मामींनी फूल देऊन एकमेकांचं स्वागत केलं. मंचावर या सहजीवन आरंभ सोहळ्याचा फलक लावला होता.
आंब्याच्या रोपाला पाणी घालून सहजीवन आरंभ सोहळ्याचे उद््घाटन झाले. झाड जसं सर्वांना फळं देतं तसंच आपलं सहजीवन आपल्यापुरतं र्मयादित न राहता त्याची फळं इतरांना चाखायला मिळावीत, अशी इच्छा त्यामागे आहे. निशाच्या घरासमोर लावलेलं ते झाड बघितलं की स्वत:ला दिलेल्या या वचनाची कायम आठवण राहील असं दोघांना वाटतं. त्यानंतर आदर्श जोडपे म्हणून सावित्रीबाई व जोतिराव फुले यांच्या फोटोंना अभिवादन केलं. संविधानाला साक्षी ठेवून सचिन व निशा यांनी एकल शपथपत्राचं वाचन केलं. त्यानंतर दोघांनी मिळून घ्यायची शपथ घेतली. शपथपत्रावर मुलीचे वडील, मुलाची आई आणि मध्यस्थ यांच्या सह्या घेतल्या. या जोडप्यानं कोणत्या शपथा घेऊन सहजीवनाची सुरुवात केली आहे याची त्यांच्या पालकांना नेहमी आठवण रहावी ही यामागची भावना होती.
मुलाने व मुलीने लग्न होईपयर्ंत एकमेकांना बघणं अपेक्षित नसतं असं सांगणारा 'आंतरपाट' नाकारून, दोघांनी हातात हात घेतले व मंगलाष्टकं झाली. सकाळी दहा वाजल्यापासूनच जेवण वाढणं सुरू होतं. माणसं आपापल्या सोयीप्रमाणे जेऊन घेत होती. लग्नामध्ये मंगळसूत्र, जोडवे, बाशिंग, मुंडावळ्या असं काही घातलं नाही. हळदीच्या कार्यक्रमात देखील कोणतंही कर्मकांड न ठेवता सर्व स्त्री-पुरुष, मुला-बाळांनी येऊन हळद लावणं एवढा मजेचा भागच होता.
लग्नानंतर नवपरिणित जोडप्यानं ताटं लाथाडून जायची पद्धत सचिनच्या गावाकडे आहे. पण सचिन आणि निशाने मिळून ती ताटं न लाथाडता उचलली व ते दोघे म्हणाले की 'आम्ही लाथाडणार नाही, सावरून घेऊ.' उपस्थित सगळ्यांना हे आवडलं आणि प्रथांमध्ये विचारानुरूप बदल करणं योग्य आहे असं वाटलं. लग्नानंतर मुला-मुलीचा संसार वेगळ्या गावात असेल तर आधी काही दिवस मुलीनं सासरी राहावं अशी पद्धत आहे. मुलाच्या घरच्यांशी तिची ओळख व्हावी हा हेतू यामागे असतो; मग मुलीच्या घरच्यांशी मुलाची ओळख नको का व्हायला? त्यामुळे तीन दिवस सचिनच्या घरी राहिल्यानंतर हे दोघे तीन दिवस निशाच्या घरी राहिले व सचिन रिझर्व्ह बँकेत नोकरीला असल्याने नंतर मुंबईला परतले. या काळात गावातील देवळांत जाऊन गाव दर्शन करायची प्रथा आहे. परंतु त्याऐवजी सचिन आणि निशा गावातील शाळेत व आश्रमशाळेत गेले. आठवी- नववीच्या मुलांशी 'वयात येताना' या विषयावर त्यांनी गप्पा मारल्या, त्यांना 'जोडीदाराची विवेकी निवड' या 'अंनिस'च्या उपक्रमाची माहिती दिली. संत तुकाराम, कुसुमाग्रज व मंगेश पाडगावकर यांच्या कवितांची पोस्टर्स शाळेला भेट दिली. अंगणवाडीत जाऊन मुलांचे खेळ घेतले. त्यांच्याबरोबर बालहक्कांचे झाड तयार केले. अशी भरपूर धमाल केली निशा आणि सचिननी त्यांच्या लग्नात आणि त्यांच्याबरोबर घरातील आबालवृद्धांनी देखील! 'हुंडा, मानपान, मुहूर्त सारं काही बाजूला सारून.. माझी साथी निशा सोबत आली सातार्यावरून' असे झकास उखाणेसुद्धा घेतले. आता दोन्ही गावांमध्ये, पै-पाहुण्यांमध्ये स्त्री-पुरूष समानता, सहजीवन, रूढी परंपरांची चिकित्सा व त्यातील कालसुसंगत बदल या गोष्टीची धमाल चर्चा रंगली आहे.
(लेखिका अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकारी आहेत.)
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा