गोष्ट एका लग्नाची!!! - महेंद्र जोरे
गोष्ट एका लग्नाची!!!
- महेंद्र जोरे
सचिनशी माझी ओळख रिझर्व्ह बँकेतच झाली, बहुदा आम्ही दोघेही नगरचे असल्याने, ऑफिसमध्ये पण शेजारीच बसत असल्याने आणि काहीसे समविचारी असल्याने चांगले मित्र बनलो. तो 'महाराष्ट्र अंनिस (अंधश्रद्धा निर्मूलन समिती)' मध्ये सक्रिय असल्यामुळे म्हणा, मला विवेकवादाचे रोजच धडे मिळत राहिले.
'बोले तैसा चाले' या उक्तीप्रमाणे तो स्वतः चे लग्न रूढ अनिष्ट प्रथांना फाटा देत, काहीतरी वेगळ्या प्रकारे करणार आहे हे मला माहित होतं. पण ते नेमके कितपत वेगळं असेल याचंच मला कुतूहल होतं.
लग्नाची एकही पत्रिका त्याने छापली नव्हती. मुळात लग्नाची तारीखही सचिन आणि निशानेच ठरवली होती, लग्नाची वेळ तर माझ्या समोरच दुपारी दीड वाजताची दुपारी बारा वाजता अशी झाली. अशा तऱ्हेने त्याने मुहूर्त पाहण्याच्या पद्धतीचेच बारा वाजवले.
आम्ही दोघांनी मिळून भरपूर इ-लग्नपत्रिका तयार केल्या होत्या, त्यातली एक त्याने Social Media द्वारा सगळ्यांना पाठवली होती. लग्नातील लोकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती या नवीन पावलाचे स्वागतच म्हणावे लागेल. ती तर या लग्नाच्या वेगळेपणाची फक्त सुरुवात होती.
काल, १९ मार्च, २०१७ पासून सचिन व निशा यांचा सहजीवन प्रवास सुरु झाला.
लग्नादिवशी आम्ही सकाळी जरा जास्तच लवकर मंगलकार्यालयात पोहचलो, त्याला भेटलो तेंव्हा तो काहीतरी कागदं चाचपडत होता, आणि नंतर त्याने कसलेतरी फॉर्म भरायला घेतले. यापूर्वी असे काहीतरी करताना मी तरी कोण्या नवऱ्या मुलाला पाहिले नव्हते. चौकशी केल्यावर त्याने तो माहिती भरत असलेल्या फॉर्मचे शीर्षक दाखवले.
'शपथ पत्र!'
शपथपत्रांमध्ये दोघांनी एकमेकाला साथ देण्याची शपथ होती. मतभेद झाल्यास ते सामंजस्याने सोडविण्याची शपथ होती, आणि तरीही मतभेद राहिल्यास एकमेकांच्या विचार-स्वातंत्र्याचा आदर करण्याचीही ती शपथ होती. व्यसनांचा धिक्कार करणारी ती शपथ होती.
आजचा दिवस म्हणजे 'ऐकावे (आणि पहावे) ते नवलच!' असा असणार हे ओळखून मी कार्यक्रम enjoy करायला सुरुवात केली...
शपथपत्रामध्ये माहिती भरल्यानंतर आम्ही एकत्र नाश्ता केला आणि मग मी उपस्थितांत सामील झालो आणि तो - नवरामुलगा - नातेवाईकांच्या घोळक्यात.
लग्नाची वर्दळ तर होतीच, पण त्यात खुद्द नवरा मुलगाच कामाच्या नियोजनात आणि त्यातल्या धावपळीत सक्रिय होता. असं सहसा घडत नाही, पण मुळात कार्यक्रम पत्रिकाच मुला-मुलीने स्वतः तयार केली असल्याने त्यात आवर्जून लक्ष घालणं आलंच. आणि हा तर विवेकी-विवाह सोहळा होता!!
या लग्नाला एक विशेष # द्यावा अशी एक theme होती, आणि त्याचा फ्लेक्स व्यासपीठावरील 'बदामांमध्ये अडकलेल्या नवरा-नवरीच्या नावां'च्या अगदी मधोमध मोठ्या अक्षरात झळकत होता. जणू तो जमलेल्या पाहुण्यांना या विशेष विवेकी-विवाहामागील विचार सांगत होता;
*"समतेच्या वाटेवरून सहजीवनाचा प्रवास"*
हळदी समारंभानंतर 'लोक पंचायत'च्या संगीतवृंदाने आपल्या समाजातील लग्न ठरवताना अनुसरल्या जाणाऱ्या अनिष्ट रूढी-प्रथांवर व त्यामागील भ्रष्ट मानसिकतेवर भाष्य करणारे महात्मा जोतिबांचे *अखंड*, संत तुकोबांचे *अभंग* आणि इतर गाणी सादर केली. त्यामध्ये वर्णभेद- (गोरेपणाचा अट्टहास- तुम्हाला काळा कृष्ण चालतो, सावळा राम चालतो. मग काळी राधा आणि सावळी सीता का नाही चालत? अशा प्रश्नांनी तर उपस्थितांना भंडावूनच सोडले), जातीभेद, व्यक्तीच्या चारित्र्यापेक्षा जमीन-जुमला-गाडीला प्राधान्य देण्याची वृत्ती यांसारख्या मुद्द्यांचा समावेश होता.
***
या अजब लग्नाचे प्रास्ताविक वाटावे अशी माहिती 'महाराष्ट्र अंनिस'च्या आरतीने उपस्थितांना दिली, त्याचा मतितार्थ पुढीलप्रमाणे-
लग्न या संकल्पनेमध्ये आपल्याकडे 'जोडीदाराची निवड' आणि 'लग्नसोहळ्याची पद्धत' या दोन घटकांमुळे मोठा फरक दिसून येतो.
जोडीदाराची निवड-
१. पारंपरिक: मुला-मुलीच्या मताला/आवडी-निवडीला विशेष किंमत न देता, पालकांनी ठरवलेला विवाह
२. प्रेम विवाह: पालकांना विश्वासात न घेता मुला-मुलीने परस्पर केलेला विवाह
लग्नसोहळ्याची पद्धत-
१. Big Fat Indian Wedding: विवाहसोहळ्यावर अमाप पैसा खर्च करणे, मग त्यासाठी कर्ज काढावे लागले तरी चालेल! पैशाच्या स्वरूपात किंवा पैशाखेरीज इतर मार्गाने मागितला जाणारा बेकायदेशीर हुंडा उदा. दागिने, मोटरगाडी इ.
२. Registered Marriage: विविध कायद्यांतर्गत विवाह नोंदणी कार्यालयात केला जाणारा विवाह
परिचयोत्तर विवाह-
या दोन्ही घटकांमधील कोणतीही टोकाची भूमिका न घेता स्व-कल्पनेतून निर्मिलेला सम्यक मार्ग अंगिकारत सचिन व निशा यांनी विवेकी-विवाह करण्याचा निर्णय घेतला. आणि त्यांना त्यांच्या पालक,आप्तेष्ट व मित्रांचा सक्रिय पाठिंबा लाभला.
गेल्या वर्षभरापासून सचिन, आरती आणि त्यांचे 'महाराष्ट्र अंनिस' मधील इतर साथी हे "जोडीदाराची विवेकी निवड" या संकल्पनेवर लग्नाळू तरुण-तरुणी, तसेच त्यांचे पालक यांसाठी जाहीर कार्यक्रम, संवादशाळा तसेच WhatsApp सारख्या प्रभावी माध्यमाद्वारे यशस्वीरित्या काम करत आहेत. जवळपास ५० दिवस WhatsApp Group वर विविध वैयक्तिक, कौटुंबिक आणि सामाजिक प्रश्नांवर एकमेकांची मते जाणून घेतली जातात, चर्चिली जातात.
यातूनच सचिन व निशाचा आधी संपूर्ण परिचय आणि आता विवाह होत आहे!! 
***
'समते'वर आधारित एका त्यांच्या आवडत्या गाण्यावर नवदाम्पत्याने मंडपात प्रवेश केला, त्यावेळी त्यांच्यावर पुष्पवर्षाव करण्यात आला. रंगीत तांदळाचा अक्षता म्हणून वापर केल्याने होणारी अन्नाची नासाडी टाळण्यासाठी, फुलांच्या पाकळ्या वाटण्यात आल्या होत्या.
सत् मंगल सत्यध्यान!!! 


व्यासपीठावर सर्वप्रथम दोघांची संपूर्ण ओळख आलेल्या पाहुण्यांना करून देण्यात आली.
दोघांनी महात्मा जोतिबा व सावित्रीबाई फुले या आदर्श दाम्पत्याच्या प्रतिमांना पुष्पहार घालून नमस्कार केला.
दोघांनी मिळून एका रोपट्याला पाणी घातले, जणू ते प्रतीक होते त्यांच्या भावी सहजीवनाचे.
स्वतंत्रपणे शपथा घेतल्यानंतर दोघांनी एकत्र शपथ घेतली, आणि ती सुद्धा 'भारतीय संविधाना'च्या साक्षीने. त्यातून दोघांनी आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सामाजिक कर्तव्यांची स्वतः ला आठवण करून दिली आणि त्यासाठी कार्य करत राहण्याची दृढेच्छा प्रकट केली.
सर्वांसमक्ष दोघा नवरा-नवरीने तसेच ३ साक्षीदारांनी शपथपत्रांवर सह्या केल्या.
यानंतर 'आधुनिक मंगलाष्टका'च्या घोषात दोघांनी एकमेकाला पुष्पहार घातले, आणि विवाहसोहळा पार पडल्याचे घोषित करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रमातील आधुनिक विधींमध्ये स्त्री-पुरुष समानतेची, तसेच व्यक्ती-सन्मानासारख्या मूल्यांची जपणूक होईल याची काळजी घेण्यात आली होती. दोघांचे दोन्ही पालक कायम त्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहून या विवेकी-विवाह सोहळ्याचा आनंद द्विगुणित करत होते. नवरा-नवरीच्या मामांसोबत माम्याही स्टेजवर मिरवत होत्या.
अशा या लग्नात ना मंगळसूत्र होते, ना होमहवन, ना होती सप्तपदी, की नव्हते कन्यादान!
अशा या अनोख्या जोडप्याला सर्वकाळ खूप खूप शुभेच्छा!!! 


ता. क.- माझी सचिनकडे फक्त एकच तक्रार आहे की, लग्नाच्या कार्यक्रमपत्रिकेत वरात नसल्याने आम्हा मित्रांना तुझ्या लग्नात नाचण्याचा आनंद नाही ना घेता आला!!! 
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा