पझेसिव्हनेस 18 - नात्यातील अपेक्षा व बंधनं

माझ्या कुटुंबाबद्दल ज्या भावना आहेत त्याच जोडीदाराच्या सुद्धा असाव्यात अशीही अपेक्षा असते. म्हणजे कुटुंबाप्रतीची किमान कर्तव्य सर्वांनी करायला हवीत हे मान्यच. पण कुटुंबालाच जास्त वेळ द्यायला हवा, बाकी गोष्टींत कमी वेळ द्यायला हवा, इतर सामाजिक कार्य किंवा छंद हे कमी वेळ व कुटुंब जास्त वेळ असा प्राधान्यक्रम असावा असं एका जोडीदाराचं म्हणणं असतं; तर त्याचवेळी दुसऱ्या जोडीदाराचं म्हणणं असतं कि कुटुंबाला काय हवं नको ते पाहून उरलेला जास्तीतजास्त वेळ छंद किंवा सामाजिक कार्यासाठी द्यावा. इथे सुद्धा माझ्या जोडीदाराने माझ्या सोबतच जास्त वेळ राहायला हवे असा एकाचा अट्टाहास दुसऱ्याची स्पेस कमी करणारा ठरू शकतो. त्याचवेळी आपल्या घरातल्यांची जबाबदारी जोडीदाराने घ्यावी आणि मला माझ्या इतर कामांसाठी मोकळं सोडावं अशी अपेक्षा करणं हे सुद्धा जोडीदारावर लादलेलं बंधन असून जोडीदाराची स्पेस अमान्य करणारेच आहे. याच्या जोडीलाच काही जणांची अपेक्षा अशीही असते कि माझ्या छंद किंवा सामाजिक कामामध्ये जोडीदाराने सुद्धा माझ्याबरोबर तेवढ्याच उत्साहाने सहभागी व्हावे. या सर्व अपेक्षा असणं चुकीचं नाही, पण त्या जोडीदाराची इच्छा किंवा तयारी नसताना त्यांच्यावर लादले जाणे हे त्रासदायक ठरू शकते.

आपल्या घरात येणाऱ्या जोडीदाराने आपल्या घरातल्यांची काळजी घ्यावी, त्यांना समजून घ्यावं, त्यांना हवं नको ते बघावं, त्यांची सेवा करावी अशा अपेक्षा ठेवणारे अनेक मुलं असतात, पण या अपेक्षांविषयी त्यांना आपल्या जोडीदाराशी लग्नाआधी काहीही बोलावं वाटत नाही. कारण 'हे बोलण्याची गरजच काय? हे तर तिने करायलाच हवं.' असं गृहीत धरलं जातं. हा त्या नात्याबद्दल असणारा पझेसिव्हनेस आहे, ज्यात समोरच्याचे मत विचारात न घेता त्याच्यावर अपेक्षा लादल्या जातात.
अनेकदा लैंगिक संबंधांच्या बाबतीत सुद्धा जोडीदाराला गृहीत धरणे आणि तिची इच्छा आहे की नाही किंवा तिला कधी, किती, कसे हवंय किंवा नकोय हे विचारात न घेता लैंगिक संबंध लादले जातात. लग्न केल्यावर हे करायचंच असतं आणि स्त्रियांना यात काय विचारायची गरज नसतेच. अशीच भावना याबाबतीत जास्त रूढ दिसते. असे प्रकार काही प्रमाणात कुठे स्त्रियांकडून ही होत असतील. हेसुद्धा जोडीदाराच्या बाबतीत मालकी भावच दाखवत असते. त्याकरता निवडी आधी दोघांनी लैंगिक संबंधांविषयी एकमेकांशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे असते. लैंगिक संबंध या विषयावर स्वतंत्र खूप काही लिहिता येण्यासारखे आहे आणि ते गरजेचे पण आहे. पण सध्या आपण इथे एवढंच लक्षात घेऊयात कि जोडीदाराला गृहीत धरून त्यांच्यावर काहीही न लादता त्यांना विचारात घेऊन दोघांनी मिळून संवादातून गोष्टी ठरवण्याने दोघांचीही स्पेस जपली जाऊ शकते व नात्यातील मालकी भाव कमी होऊ शकतो.
आपल्या जोडीदाराला एखादी गोष्ट सांगताना 'तू असं करावं असं मला वाटतं' असं सांगणं आणि 'तू असं करायला *च* हवं असं सांगणं' यातला फरक हा तुमच्यातील पझेसिव्हनेसची पातळी सांगणारा असतो. तो जाणीवपूर्वक आपल्याला कमी करता येऊ शकतो. याकरता फक्त प्रत्येक वेळी समोरच्या व्यक्तीचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करून त्यांच्या बाबतीतले कोणतेही निर्णय स्वतः न घेणे व आपले मत समोरच्यावर न लादणे एवढे करता येणे किमान गरजेचे आहे. नात्यातील अपेक्षा व बंधनं ही त्या नात्याबद्दल मनात असणाऱ्या पझेशन मधूनच येत असतात. हे मर्यादित प्रमाणात असणं ही अनेकदा नात्याची गरज सुद्धा असते व नात्यात जिवंतपणा सुद्धा आणते. पण त्यांचा अतिरेक झाला तर ते त्रासदायक ठरू शकतात.
- सचिन (8424041159)
(तुमचे याविषयीचे काही मत, प्रतिक्रिया, अनुभव असतील तर नक्की शेअर करा.)

टिप्पण्या