पझेसिव्हनेस 16 - (गृहीत धरणे)

पझेसिव्हनेस मधून गृहीत धरणे हा प्रकार खूप कॉमन आहे. त्यातूनच आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतीतले अनेक निर्णय आपणच घ्यायचा प्रयत्न करतो किंवा नकळतपणे तो आपल्याकडून होतो. अनेकदा जोडीदाराला गृहीत धरूनच आपण काही नियोजन बनवतो, ज्याची जोडीदाराला कल्पना देखील नसते. आपण त्यांना चांगलं ओळ्खतोय आणि त्यामुळे त्यांना विचारण्याची काय गरज नाही असाही भाव अनेकदा असतो. (अर्थात आपण यात पुरुषप्रधान व्यवस्था न मानणाऱ्या जोडीदारांबद्दल बोलतोय हे लक्षात घेऊयात. कारण जिथे ती मान्य असते तिथली परिस्थिती तर फार वेगळीच असते.)

अनेकदा आपल्या घरातील कुटुंबियांबाबत सुद्धा जोडीदाराकडून काही गोष्टी आपण यातूनच गृहीत धरत असतो. त्याबद्दल जोडीदाराशी बोलून त्यांचे मत विचारात न घेता अपेक्षा ठेवल्या जातात आणि मग त्या पूर्ण नाही झाल्या, तर त्याचे खापर पुन्हा जोडीदारावर फोडले जाऊ शकते. आपल्या जोडीदाराबद्दल असणाऱ्या प्रेमातून आपल्या काही अपेक्षा किंवा काही नियोजन जोडीदाराबाबत आपल्या मनात असणे हे साहजिक आहे. अर्थात आपल्या जोडीदाराबाबत काही अपेक्षा ठेवणे, त्यानुसार त्याने वागायला हवे अशी इच्छा ठेवणे, आपल्या मते काही चुकीच्या असणाऱ्या जोडीदाराच्या गोष्टी बदलायला हव्यात असे वाटणे व त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करावेसे वाटणे हासुद्धा आपल्या जोडीदाराबाबत असणारा पझेसिव्हनेसच आहे हे सुद्धा आपण लक्षात घेणे गरजेचे आहे. अर्थातच जोडीदाराबद्दलच्या प्रेम आणि काळजीतूनच हा पझेसिव्हनेस आलेला असतो हे खरंच आहे. पण हेच जर जोडीदाराशी बोलून मग ठरवले गेले तर जोडीदाराचे स्वतंत्र अस्तित्व, मत व निर्णय स्वातंत्र्य मान्य केले जाते. तसेच त्यानंतरची कार्यवाही सुद्धा त्यांच्या संमतीने व त्यांना विश्वासात ठेवूनच केली जायला हवी. कोणतीही गोष्ट चूक किंवा बरोबर असणं आणि त्याच्या कमी-जास्त पातळ्या ठरवणं हे सगळं व्यक्तिसापेक्ष असल्याने प्रत्येक व्यक्तीगणिक त्याची व्याख्या व तीव्रता बदलत असते हे लक्षात ठेवून आपल्याला जे समोरच्याबद्दल वाटतंय तेच त्यांनाही वाटायला हवं हा आग्रह न धरता एकमेकांशी बोलून दोघांच्या भावना व विचारांचा मध्य गाठता येतोय का ते तपासणं गरजेचं आहे. समजा मला माझ्या जोडीदाराची एखादी चुकीची गोष्ट जाणवली तर ती त्यांना सांगणं इथपर्यंतचा माझा पझेसिव्हनेस चांगलं काम करू शकतो; पण मला वाटतंय ते समोरच्याने मान्य करायला *च* हवं आणि तसं *च* वागायला हवं असा अट्टाहास जिथे येतो तिथे पझेसिव्हनेसची पातळी प्रमाणापेक्षा जास्त होतेय हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
- सचिन (8424041159)
(तुमचेही असे काही अनुभव, प्रतिक्रिया, मत मला वैयक्तिक व्हाट्सअप्प वर किंवा फेसबुकवर सुद्धा शेअर करू शकता.)

टिप्पण्या