घरकाम - 1

                                                                 घरकाम - 1

आजही काही अपवाद वगळता जवळपास सर्वच घरांमध्ये घरकाम हे फक्त स्त्रियांचेच काम समजले जाते. मग भलेही त्या स्त्रिया नोकरी करणाऱ्या असोत, व्यवसाय करणाऱ्या असोत, सरकारी कर्मचारी असोत कि आणखी काही. स्त्री स्वतंत्र झालीय अशा हवेत गप्पा मारत असताना आजही स्त्रीची साधी घरकामाच्या जबाबदारीतून सुटका झालेली नाही हे वास्तव आहे. अनेकदा स्त्री पंतप्रधान, स्त्री राष्ट्रपती, स्त्री पायलट, स्त्री ड्रायव्हर अशी काही उदाहरणे सांगून - 'बघा स्त्रियांना मिळालीय कि आता सगळीकडेच संधी. कुठे कोण अडवतंय स्त्रियांना? तरी उगाच अजूनही का बोंबा मारताय स्त्री स्वातंत्र्याच्या नावाने?' असं म्हणणारे महान माणसं भेटतात, तर दुसरीकडे अशीच उदाहरणे सांगून 'स्त्री आता कुठल्याच क्षेत्रात मागे नाही' असं म्हणणारी भाबडी माणसं सुद्धा दिसतात.
यांच्यासाठी लिंग समानता ही नेमकी कोणकोणत्या मुद्द्यांवर आणि कशी तपासून पाहायला हवी याविषयी वेगळं सविस्तर लिहावं लागेल. अगदी तसंच स्त्री स्वातंत्र्याचं सुद्धा आहे. 'आमच्या घरातील सुनेला काहीही बंधनं नाहीत' असं म्हणणारे काही स्त्री स्वातंत्र्यप्रेमी पुढे असं जोडतात कि - 'फक्त तिने घर सांभाळून सगळं करावं.' म्हणजे अजून आम्हाला स्वातंत्र्य कशाशी खातात याचंही काही भान आलेलं दिसत नाही अशीच परिस्थिती आहे. हे फक्त एक उदाहरण झालं. गेल्या चार वर्षांत महाराष्ट्रभरातील अनेक ठिकाणची अशी अनेक उदाहरणे पाहायला, ऐकायला मिळाली. अर्थात स्त्री स्वातंत्र्य हे फक्त घरकामापुरतेच सीमित नक्कीच नाहीये, पण इतक्या साध्या बेसिक गोष्टीतून आम्ही अजून स्त्रीला बाहेर काढू शकलो नाही असा याचा अर्थ आहे. स्त्री स्वातंत्र्याचा विचार करताना त्याची सुरूवातच घरकामापासून होते हे आपल्या समाजातील दुःखद वास्तव आहे. त्याच्या पुढच्या टप्प्यावर मग नोकरी, व्यवसाय, आर्थिक नियंत्रण, संचार, आचार, पेहराव, निर्णय, मतं, अभिव्यक्ती, नकार, भावना, आनंद, दुःख, शेअरिंग, प्रेम, लैंगिक ओढ, शारीरिक क्षमता, प्रजनन, संगोपन, पालकत्व, स्पेस, स्वत्व यांसारख्या बऱ्याच गोष्टी आहेत कि त्यातल्या एकेकाविषयी बारकाईने भरपूर लिहिता, सांगता येऊ शकतं आणि ते सांगण्याची गरज पण आहे. वेळ आणि संधी मिळेल तसं यातल्या एकेका मुद्द्यावर पुढे बोलूच आपण. पण सध्या आपण सुरुवात करूयात या सगळ्याची जास्त जाणीव जिथं होते आणि रोजच्या दैनंदिन आयुष्यात या गोष्टीला सामोरं जावंच लागतं अशा घरकाम या मुद्द्यापासून.
(याविषयी मी लिहितच राहणार आहे जमेल तसं एकेक करत. फार मोठा लेख न लिहिता थोडं थोडं लिहिण्याचा विचार आहे. जेणेकरून सर्वांना वाचायलाही सोपं राहील.
यादरम्यान तुमचेही यासंदर्भात काही अनुभव असतील किंवा कुणाला काही सांगायचे असेल, शेअर करायचे असेल तर माझ्याशी 8424041159 या माझ्या व्हाट्सअप्प नंबर वर शेअर करू शकता. शक्यतो कॉल पेक्षा मेसेजवर बोलणे मला जास्त सोयीचे असल्याने कॉल करण्यापेक्षा मेसेजच करा.
- सचिन)

टिप्पण्या